विनेश फोगाटच्या अपात्रतेची बातमी वाऱयाच्या वेगाने पसरल्यानंतर याप्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले. फोगाटने केलेल्या कामगिरीवर तिचे कौतुक करणाऱया ट्विटच्या तुलनेत ती अपात्र झाल्यानंतर त्यावर संताप व्यक्त करणाऱया ट्विटचा पाऊस पडला. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटही चर्चेत राहिले.
विनेश फोगाट अंतिम फेरीत पोहोचल्याची बातमी आली तेव्हाच तिचे रौप्य किंवा सुवर्ण पदक निश्चित झाले होते. मंगळवारचा दिवस विनेशने हिंदुस्थानींसाठी खास बनवला. तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र यात पंतप्रधान मोदी यांचे कौतुकाचे दोन शब्दही कुठे दिसले नाहीत. आज विनेश अपात्र ठरल्यानंतर मोदींनी ट्विट केले. विनेश तू चॅम्पियन आहेस, हिंदुस्थानचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहे, भारताला बसलेला हा धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत मांडू शकत नाही. या निर्णयाने साऱयांनाच प्रचंड निराशा आली आहे. पण मला माहीत आहे की तू एक योद्धा आहेस, तू दमदार पुनरागमन कर, आम्ही सर्वजण तुझ्याचसोबत आहोत, असे त्यात मोदींनी नमूद केले. या ट्विटवरून सोशल मीडियातून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
मोदींनी याप्रश्नी कठोर भूमिका घेऊन विनेशला अपात्र ठरवण्यामागे षड्यंत्र आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी काही नेटकऱ्यांनी केली. आंदोलनावरून भाजपच्या ट्रोल आर्मीकडून करण्यात आलेली बदनामी, गोदी मीडियाने उठवलेली टीकेची झोड याचे व्हिडिओही सोशल मीडियात पुन्हा या निमित्ताने व्हायरल झाले. विनेश तुझे वजन आता खऱयाअर्थाने वाढले आहे, असे म्हणत काही नेटकऱयांनी तिचे कौतुक केले. देशाच्या लेकीला कुस्तीच्या आखाडय़ात कुणी हरवू शकलं नाही मात्र कारस्थानाच्या आखाडय़ात ती पराभूत झाली, असा संताप शेतकरी नेते राकेश टीपैत यांनी व्यक्त केला.