
मणिपूरमध्ये अरम्बाई टेंगोल या मैतेई संघटनेचे नेते करन सिंह यांना 2023 मध्ये हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली आज सीबीआयने अटक केली. त्यानंतर उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये महागाई प्रचंड वाढल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. दरम्यान, सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. s महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. चुराचंदपुर आणि इम्फाळमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मणिपूरमध्ये प्रतिबंधात्मक आदेशानंतर रात्रभर हिंसाचार
मैतेई संघटनेचे नेते करन सिंह यांच्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर उफाळून आलेला हिंसाचार रविवारी रात्रभर सुरुच होता. सरकारने पाच जिह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला आणि सरकारी इमारत पेटवून दिली.क्वाकेथल येथे सुरक्षा दलाचे जवान आणि आंदोलक यांच्यात चकमक उडाली. जमाव आणखी आक्रमक होऊ नये यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांडय़ा फोडल्या तसेच रबराच्या बुलेट्सचा आंदोलकांवर मारा केला.
अटक केलेला मैतेई नेता माजी हेड कॉन्स्टेबल
अटक करण्यात आलेला मैतेई नेता आशेम कानन सिंह हा मणिपुर पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. परंतु, मार्च 2025 मध्ये त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. असा दावा मणिपूर पोलिसांनी केला आहे. त्याच्यावर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप होता. शस्त्रास्त्रांची तस्करीही तो करत होता. कानन सिंह अरमबाई टेंगोल या मैतेई संघटनेचा सदस्य आहे.