
जागतिक स्तरावर परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असताना हिंदुस्थानने आपले लष्करी सामर्थ्य वाढवले आहे. शुक्रवारी बॅलिस्टिक मिसाईलने सज्ज ‘आयएनएस अरिदमन’ ही तिसरी आण्विक पाणबुडी हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. ‘आयएनएस अरिदमन’मुळे देशाची सागरी ताकद मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. याचसोबत नौदलाच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या कार्यक्रमात अत्याधुनिक बनावटीच्या ‘आयएएन तारागिरी’चेदेखील जलावतरण पार पडले.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आयएएन तारागिरी’चे जलावतरण झाले. त्यानिमित्ताने ‘फक्त शब्द नाही, शक्ती आहे… अरिदमन’ असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले होते. राजनाथ सिंह यांनी आयएनएस अरिदमन हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे वाढलेल्या सामर्थ्याचा गौरव केला. तसेच देशाच्या सागरी सीमा आता अधिक सुरक्षित झाल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकाच वेळी तीन पाण्यबुडय़ांचे संरक्षण
‘आयएनएस अरिदमन’च्या समावेशामुळे आता हिंदुस्थानच्या सागरी सीमांना तिहेरी संरक्षण लाभले आहे. आयएनएस अरिहंत व आयएनएस अरिघात आणि आता आयएनएस अरिदमन या लांबपल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू पाणबुडय़ांमुळे शत्रूला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. यामुळे देशाच्या सागरी सीमांना भक्कम संरक्षण कवच लाभले आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी हिंदुस्थानच्या तीन अण्वस्त्रवाहू पाणबुडय़ा समुद्रात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे!
‘अरिदमन’ची वैशिष्टय़े
‘आयएनएस अरिहंत’नंतर ‘आयएनएस अरिदमन’ ही हिंदुस्थानची दुसरी अरिहंत श्रेणीतील अण्वस्त्रवाहू पाणबुडी आहे. ही पाणबुडी दीर्घकाळ पाण्याखाली राहण्यास सक्षम असून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. यात 750 किमी पल्ल्याची के-15 किंवा 3,500 किमी पल्ल्याची के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs तैनात केली जाऊ शकतात. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला रोखण्यासाठी अरिदमनची भूमिका अत्यंत कळीची ठरेल.
अदृश्यपणे शत्रूचा वेध घेणारी ‘तारागिरी’
प्रोजेक्ट 17ए अंतर्गत तयार करण्यात आलेले ‘आयएनएस तारागिरी’ हे एक स्टेल्थ फ्रिगेट आहे. याचे डिझाइन अशा प्रकारे केले आहे की ते शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाही. यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रs आणि अत्याधुनिक टॉर्पेडो प्रणाली बसवण्यात आली आहे. तारागिरी वेगाने आणि अचूक मारगिरीने समुद्रात हिंदुस्थानचे वर्चस्व सिद्ध करेल.



























































