
किशोर यूझर्सना अधिक सुरक्षित ऑनलाइन अनुभव देण्यासाठी इन्स्टाग्रामने एक नवीन सुरक्षा फीचर सादर केले आहे. मेटाने घोषणा केली आहे की, किशोरवयीन मुलांना आता फक्त पीजी-13-स्तराचा कंटेंट दिसेल. याचा अर्थ त्यांना प्रौढ (18 प्लस), ड्रग्ज किंवा धोकादायक स्टंट यासारख्या संवेदनशील विषयांशी संबंधित पोस्ट दिसणार नाहीत. गेल्या वर्षी लाँच झालेल्या ‘टीन्स अकाऊंटस्’ फीचर्सनंतर हा सर्वात मोठा बदल असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
मेटाने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, 13 ते 17 वयोगटातील यूझर्सना आता प्रौढ कंटेंट, ड्रग्ज, हिंसाचार किंवा धोकादायक स्टंट असलेला कंटेंट दिसणार नाही. कंपनीने त्याचे वर्णन पीजी-13 चित्रपटांसारखेच अनुभव असे केले आहे. याचा अर्थ किशोरवयीन मुलांना सामान्य ‘13 प्लस’ चित्रपटासारखाच कंटेंट दाखवला जाईल. मुलांची सुरक्षितता आणि मानसिक आरोग्य लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पालकांच्या परवानगी गरजेची
टीन्स यूझर आता स्वतःहून त्यांच्या कंटेंट सेटिंग्ज बदलू शकणार नाहीत. एखाद्या मुलाला अधिक स्पष्ट कंटेंट पाहायचे असेल तर त्यांना पालकांची परवानगी घ्यावी लागेल. मेटाने पालकांसाठी एक नवीन लिमिटेड कंटेंट मोडदेखील जोडला आहे, ज्यामुळे ते त्यांच्या मुलांचा अॅक्सेस आणखी मर्यादित कंटेंटपर्यंत मर्यादित करू शकतात. मेटाने म्हटले आहे की, कठोर भाषा, धोकादायक स्टंट किंवा नशेशी संबंधित कंटेंट असलेल्या पोस्ट आता लपवल्या जातील किंवा प्लॅटफॉर्मवर शिफारस केल्या जाणार नाहीत.