बिनव्याजी कर्ज: 50 लाखांचे कर्ज… शून्य व्याज, 15 ऑगस्टला राज्य सरकारची मोठी घोषणा!

देशात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या 78 व्या स्वातंत्र्य दिनी मिझोराम सरकारने मोठी घोषणा केली आहे. गुरुवारी मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी राज्यात पात्र व्यक्तींना 50 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी योजना लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा केली.

गुरुवारी सकाळी लालदुहोमा यांनी ध्वजारोहनानंतर लोकांना संबोधित करत असताना ही घोषणा केली. यावेळी, सर्वसमावेशक प्रशासनाव्यतिरिक्त, आमचे सरकार राज्याचा विकास, त्याचबरोबर सामान्य सेवा देखील पारदर्शकतेने पोहचविण्याच्या प्रयत्नांत आहे. सामान्य लोकांना उत्तम सेवा पोहचविण्याचा राज्याचा निर्धार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, लालदुहोमा यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की, राज्य सरकार राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी मोठे पाऊल उचलत कर्ज योजना सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेद्वारे, आर्थिक विकासासाठी इच्छूक असलेल्या तसेच पात्र असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सरकार हमीदार म्हणून काम करणार आहे. मिझोराम सरकारी हमी कायदा 2011 मध्ये देखील सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, जेणेकरून पात्र असलेल्या व्यक्तींना 50 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल आणि त्याच सोबतच, सरकार व्याज देखील भरेल.

या घोषणेसोबतच इतर महत्वाच्या घोषणादेखील केल्या आहेत. राज्यात लवकरच युनिव्हर्सल हेल्थ केअर योजना देखील सुरू करणार असल्याचे लालदुहोमा यांनी सांगितले. या योजनेमध्ये सर्वसामान्यांसोबतच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या प्रगतीसाठी उचललेल्या पावलांचा संदर्भ देत लालदुहोनमा यांनी, त्यांच्या सरकारने राज्यातील आणि बाहेरील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मिझोराम गुंतवणूक धोरण 2024 केले आहे. तसेच सरकार कृषी किंवा बागायती उत्पादनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी, अन्न प्रक्रिया, कृषी आणि कौशल्य विकास तसेच तरूणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.