>> प्रसाद ताम्हनकर
राष्ट्रीय सुरक्षा हा प्रत्येक देशासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. जगातील प्रमुख देशांचे सुरक्षा बजेट पाहिले तरी आपले डोळे फिरतील. अत्याधुनिक शस्त्र, हेरगिरी प्रणाल्या, सर्वोत्तम मिसाइल, पाणबुडय़ा, अण्वस्त्र, तोफा असे विविध शस्त्र प्रकार आपल्या सैन्याकडे असावेत आणि आपले सैन्यदल हे कायम सुसज्ज असावे अशी प्रत्येक देशाची इच्छा असते. ही शस्त्र मिळवण्यासाठी देशादेशांमध्ये विविध करार होत असतात. काही करार उघड असतात, तर काही करार हे गुप्त असतात. काही देश तर यापुढे मजल मारून इतर देशांची शस्त्र आणि इतर सामायिक माहिती चक्क चोरी करतात व त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करतात. या चोरीसाठी जगभरात सर्वात कुप्रसिद्ध देश म्हणजे उत्तर कोरिया.
अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरिया या तीन देशांनी मिळून नुकताच जगातील प्रमुख देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाच्या हॅकर्सकडून जगभरातील प्रमुख देशांच्या संरक्षण प्रणाली, शस्त्रांची माहिती, पाणबुडी व इतर संसाधनांची डिझाइन्स पळवण्याचा प्रयत्न जोमाने सुरू आहे. यासाठी विविध देशांना शस्त्रास्त्र सज्ज होण्यासाठी मदत करणाऱया खासगी कंपन्यांनादेखील लक्ष्य बनवले जात आहे. आण्विक, एरोस्पेस, संरक्षण आणि मिलिटरी इंजिनिअरिंग, युरेनियम, रिफायनरी, पाणबुडय़ा आणि रणगाडे या क्षेत्रातील कंपन्यांना प्रामुख्याने लक्ष्य बनवले जात आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्रिटन यांच्या सोबत या हॅकर्सनी आतापर्यंत जपान आणि हिंदुस्थानलादेखील लक्ष्य बनवलेले आहे.
धोक्याचा इशारा देताना या हॅकर्स ग्रुपपासून सामान्य लोकांनादेखील धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. हे हॅकर्स मोठय़ा प्रमाणावर सामान्य लोकांची माहिती गोळा करणे, त्यांना ब्लॅकमेल करणे, आर्थिक फसवणूक या मार्गाने अब्जावधी रुपयांची लूट विविध देशांतून करत आहेत. हा मिळालेला पैसा शक्यतो ते क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बदलून घेत असल्याने त्याचा माग घेणेही मुश्कील होत आहे. गैरमार्गाने मिळवलेला हा सर्व पैसा हे हॅकर्स विविध देशांतून संरक्षण माहिती चोरण्याच्या मोठय़ा कामासाठी वापरतात. अनेकदा सामान्य माणसाच्या जिवाची पर्वा न करता या हॅकर्सनी मोठमोठय़ा हॉस्पिटल्सनादेखील आपले लक्ष्य बनवले आहे आणि खंडणी उकळली आहे.
2014 मध्ये सोनी पिक्चर्सने निर्माण केलेल्या एका विनोदी चित्रपटात उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याची हत्या झाल्याचे दाखवण्यात आले होते. याचा बदला म्हणून सोनी पिक्चर्सवर सर्वात मोठा सायबर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर उत्तर कोरियाचे लझारससारखे अत्यंत धोकादायक हॅकर्स ग्रुप जगभरातील तपास यंत्रणांच्या रडारवर आले. अमेरिकन स्पेस एजन्सी नासालादेखील लक्ष्य करण्यापर्यंत या हॅकर्सची मजल गेली होती. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अत्यंत विश्वासातल्या अशा एका व्यक्तीचा ई-मेल हॅक केला होता.
उत्तर कोरियावर आणि त्यांच्या हॅकर्स ग्रुपवर आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नाही. हे हॅकर्स ग्रुप सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपदेखील अनेकदा केला जातो. जगभरातील अनेक मोठय़ा सायबर हल्ल्यांच्या मागे उत्तर कोरियाचे धागे कुठे ना कुठे जुळल्याचे समोर आले आहे. सध्या हे हॅकर्स जगभरातील आाटोमॅटिक वेपन्स, थ्री डी प्रिंटिंग आणि रोबोटिक मशीनरी क्षेत्राला विळख्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. उत्तर कोरिया आपल्या सैन्याची सुसज्जता आणि आपला आण्विक कार्यक्रम पुढे रेटण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो असा इशारा जगभरातील अनेक सुरक्षा तज्ञ नेहमी देत असतात. अशा वेळी सरकारी संरक्षण संस्था आणि सुरक्षा दलांशी जोडल्या गेलेल्या खासगी संस्था यांच्याकडील अत्यंत गोपनीय आणि महत्त्वपूर्ण माहितीच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था आखण्याची आणि निश्चित कार्यक्रम ठरवण्याची नितांत आवश्यकता आहे.
पुढचे महायुद्ध झाले तर ते बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवून नाही, तर संगणकाच्या कीबोर्डवर बोट ठेवून होईल ही अनेक तज्ञांनी व्यक्त केलेली भीती जगभरातील प्रमुख देश गंभीरपणे घेऊ लागले आहेत हाच काय तो थोडाफार दिलासा.
>> [email protected]