अचानक फायर अलार्म वाजू लागला, आपत्कालीन दरवाजातून प्रवासी थेट विमानाच्या पंखावर चढले

स्पेनमधील सोन सँट जोन विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाल्माहून मॅन्चेस्टरला जाणाऱ्या रायन एअरच्या बी737 हे विमान धावपट्टीवर उभे असताना त्यात अचानक फायर अलार्म वाजू लागला. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रवासी आपत्कालीन दरवाजातून विमानाच्या पंख्यावर चढले आणि खाली उड्या घेतल्या. यात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 12.35 वाजता ही घटना घडली.

स्पेनमधील पाल्मा दे मॅलोर्का विमानतळावर रायनएअर बोईंग 737 विमानाला अचानक आग लागली. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. आपत्कालीन विभागाला तात्काळ याची माहिती देण्यात आली आणि बचाव कार्य सुरू झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि सिव्हिल गार्डच्या सदस्यांनी प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढले. अपघातानंतर, प्रवाशांना आपत्कालीन गेटमधून बाहेर काढण्यात आले, ज्यामध्ये काही प्रवाशांनी बचावासाठी पंखांवरून थेट जमिनीवर उडी मारली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपत्कालीन केंद्राच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण 18 जण जखमी झाले आहेत आणि त्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे. पाल्माहून मँचेस्टरला जाणाऱ्या विमानात चुकीने आगीच्या चेतावणीचा प्रकाश चालू झाल्यामुळे टेकऑफ रद्द करावे लागले, असे एअरलाइन्सने सांगितले.