बी पॉझिटिव्ह – आयुष्याचं चैतन्य गवसलं

चेतन दातार याने सकारात्मक विचारांचं दान माझ्या ओंजळीत टाकलं आणि कळत नकळतपणे माझी मी वैचारिकरीत्या, भावनिकरीत्या समृद्ध होत गेले… सांगतेय अभिनेत्री शिल्पा नवलकर.

नकळत्या वयापासूनच आपल्यावर आई-वडिलांचा, कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचा प्रभाव असतो आणि त्या प्रभावाखाली आपली घडवणूक होत असते…विचारांची, संस्कारांची. जसजसे आपण मोठे होत जातो आणि नवे क्षितिज शोधायला पाऊल बाहेर टाकतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचे एक नवे अवकाश आपल्यासाठी खुले होते. आज मी जी काही आहे, ज्या पद्धतीने माझी विचारसरणी आहे, त्यामागे एक सर्वात मोठं आणि महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे. ते म्हणजे चेतन दातार.

पूर्वी मी कोणताही निर्णय घेताना लोक काय म्हणतील? एखादा काय म्हणेल? हा विचार करायचे. हे ऐकल्यावर चेतन मला म्हणाला होता, ‘‘शिल्पा, एखादा म्हणजे कोण?’’ त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्या क्षणी माझ्याकडे नव्हतं, आजही नाहीये. मी म्हटलं की, ‘‘तसं अमुक अमुक नाव नाही सांगता येणार. म्हणजे बघ ना, नाही नाव सांगता येणार.’’ माझं वाक्य संपण्याच्या आधीच चेतन म्हणाला, ‘‘शिल्पा बघ, ज्या व्यक्तीचं तुला नावसुद्धा सांगता येणार नाही त्याची रिएक्शन तुझ्या निर्णयावर किंवा वागण्यावर काय असू शकेल? याचा विचार करताना तू तुझी किती शक्ती वाया घालवतेस आणि तुझं पोटेन्शिअलसुद्धा.’’ त्या क्षणी त्याच्या बोलण्याचा अर्थ किंवा ते ‘बिटवीन द लाइन’ म्हणतात ना, तसं नाही लक्षात आलं माझ्या, पण थोडय़ाच कालावधीमध्ये मला त्याचा अर्थ उमगला आणि मग माझ्यामध्ये मी आमूलाग्र बदल केला. कारण तुम्ही कसेही वागलात तरी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही केलेल्या गोष्टी रुचतीलच असं नाही. मग सर्वांना आनंदी ठेवण्याचा अट्टाहास का ?

खूप पूर्वीची आठवण सांगते. आम्ही मैत्रिणी मिळून लँडलाइनवर वेगवेगळ्या अनोळखी, ओळखीच्या लोकांना फोन करून ब्लँक कॉल देत होतो. अचानक मला असं वाटलं की, चेतनच्या घरच्या फोनवर ब्लँक कॉल देऊन अशीच गंमत जंमत करूया. आम्ही बरेच फोन केले व ते त्याने उचलले. आम्ही काही बोललो नाही. त्याने ठेवून दिले. असं करता करता 12 की 13 व्या फोनला त्याने फोन उचलला आणि शांतपणे त्याच्या हातातलं पुस्तकाचं वाचन मोठय़ाने सुरू ठेवलं. चेतन चिडला नाही. तो शांतपणे मोठय़ाने पुस्तक वाचत राहिला. त्याचे वाचन आम्हाला स्पष्टपणे ऐकू येत होतं. त्या गमती जमतीतून एक गोष्ट मी नकळत शिकले ती अशी की, समोरच्या व्यक्तीने आपल्याला कितीही विचलित करण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही अचल राहायला पाहिजे. आपलं काम निष्ठsने करत राहिले पाहिजे.

दरवेळेला लोक आपल्याला हवे तसे वागतील असं नाही. आपण त्यांचं वागणं बदलू शकतो का? आपल्या हातात किंवा काबूत काय आहे, तर स्वतःची रिएक्शन बदलणं. बाहेर कितीही बरबटलेलं असलं तरी आपल्याला आपल्यापुरतं सारवता आलं तर मग नात्यांच्या गुंतागुंतीचा पसारा होत नाही दमछाक टळते. मग आपण स्वतः आणि आपलं मन दोन्हीसुद्धा टवटवीत राहतं. आज चेतन शरीराने आपल्यात नसला तरी त्याच्या विचारांनी तो जिवंत आहे आणि अमर राहील हे निश्चित!

नवचेतना देण्याचे श्रेय त्याचेच…

आज तुम्हा रसिक वाचकांशी गप्पा मारता मारता माझ्याही नकळत मी 28-30 वर्षे मागे पोहोचले, जेव्हा चेतनची आणि माझी पहिली भेट झाली होती. मला ओळखणारी माणसं -मग ती इंडस्ट्रीतली असोत किंवा इंडस्ट्रीबाहेरची- ती म्हणतात, ‘‘शिल्पा, तू खूप सॉर्टेड आहेस’’ आणि हो, हे मला मान्यसुद्धा आहे. मला सॉर्टेड बनवून एक नवचेतना देण्याचं सारं श्रेय जातं ते चेतन दातारला.

– शब्दांकन – निनाद पाटील