
पुणे जिह्यातील वरोती आणि भोर्डी येथील पाझर तलाव प्रकल्पांच्या कामांदरम्यान बेकायदेशीर उत्खननासंदर्भात काही अनियमितता झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत सांगितले.
वरोती आणि भोर्डी येथील पाझर तलावातील खजिनाचे उत्खनन करून कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याबाबत आमदार अॅड. अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ही दोन्ही गावे केंद्र सरकारच्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये नोटिफाईड झाली आहेत का? त्यात उत्खनन झाले आहे की नाही? याबाबत केंद्र सरकारची परवानगी आहे का? निविदेत 5 कोटी 37 लाखांची कामे असताना बिले 50 कोटींची का निघाली, दहापटीने खर्च का वाढला? असे प्रश्न अॅड. परब यांनी उपस्थित केले. त्यावर मंत्री संजय राठोड म्हणाले, या दोन्ही ठिकाणचे काम जलसंधारण महामंडळामार्फत मंजूर करण्यात आले आहे. या दोन्ही गावांचा समावेश केंद्र शासनाने जाहीर केलेल्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये असला तरी केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार काही प्रकल्पांसाठी विशिष्ट अटींनुसार कामे करण्यास परवानगी आहे. उत्खननासंदर्भात काही अनियमितता झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.




























































