अखेर 106 दिवसांनंतर चिदंबरम सुटले

296

INX Media मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री, काँग्रेस नेते P. Chidambaram यांना मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अखेर 106 दिवसांनंतर चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली.

रात्री 8.20 च्या सुमारास चिदंबरम तिहारबाहेर आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली व जल्लोष केला. पोलीस बंदोबस्त तिहारबाहेर वाढविण्यात आला होता. दरम्यान, संसदेत चिदंबरम हजर राहण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या नेतृत्वाखालील ए. एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने मंगळवारी चिदंबरम यांचा दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये अशा अटी घातल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांना जामीन देण्यास न्यायालयात विरोध दर्शविला. चिदंबरम तुरुंगातून बाहेर आल्यास ते पुराव्यांची छेडछाड करू शकतात असे ईडीने सांगितले, मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. चिदंबरम हे कोणत्याही राजकीय पदावर नाहीत. सरकारमध्येही त्यांच्याकडे कोणतेही पद नाही. त्यामुळे ‘ईडी’चे म्हणणे मान्य होण्यासारखे नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणातील एक साक्षीदार हा चिदंबरम यांच्या राज्यातील आहे. त्यामुळे तो साक्ष देण्यास तयार नाही हा ‘ईडी’चा दावाही न्यायालयाने फेटाळला. यासाठी चिदंबरम यांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच साक्षीदारांचे मन वळविले किंवा धमकावल्याचे कोणतेही पुरावे नाहीत असे न्यायालयाने सांगितले.

काय आहे प्रकरण?

  • 2007 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम यांच्या अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आयएनएक्स मीडियाला 305 कोटी रुपयांचा परकीय निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती.
  • या मंजुरीत अनियमितता आढळल्याने 15 मे 2017 रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
  • 21 ऑगस्ट 2019 रोजी सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली होती.
  • ईडीनेही मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
  • आयएनएक्स मीडिया प्रकरणात याआधीही चिदंबरम यांना जामीन मिळाला होता.
  • मनी लाँडरिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला.

सूडबुद्धीने केलेली कारवाई होती -राहुल गांधी

चिदंबरम यांची 106 दिवसांची अटकही केंद्र सरकारने सूडबुद्धीने केलेली कारवाई होती. सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यामुळे अखेर सत्याचा विजय झाला. ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. चिदंबरम यांना जामीन मिळाल्यामुळे मला आनंद आहे. निष्पक्ष सुनावणीत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतील असा मला विश्वास असल्याचे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मीडियाला मुलाखती देण्यास मनाई

चिदंबरम यांनी आयएनएक्स-मीडिया खटल्याशी संबंधित कोणतेही जाहीर वक्तव्य करू नये. यासंबंधी मीडियाशी मुलाखती देऊ नयेत अशाही अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या