ग्राहकांची मागणी वाढल्याने आयफोन 17 महागणार

सप्टेंबर महिन्यात लाँच झालेला आयफोन 17 महाग होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यापासून आयफोन 17 सीरिजमधील फोनला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. लाखो फोन हातोहात विकले गेले आहेत. ग्राहकांची जास्त मागणी आणि स्टॉक कमी असल्याने अॅपल कंपनी आयफोन 17 च्या किमतीत सात हजार रुपयांपर्यंत वाढ करू शकते, असा अंदाज एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे. कंपनीने किमतीसंबंधी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. आयफोन 16 च्या तुलनेत आयफोन 17 च्या बेसमध्ये 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. आयफोन 17 च्या 256 जीबी स्टोरेजच्या बेस मॉडलची किंमत 82,900 रुपये आहे. या फोनच्या 512 जीबी स्टोरेज मॉडलसाठी 1 लाख 2 हजार 900 रुपये मोजावे लागते. या फोनच्या किमतीत सात हजार वाढ केल्यानंतर ग्राहकाला काही बँकेच्या कार्डवर ऑफर्सही मिळू शकतील, परंतु तरीही फोनसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. आयफोन 17 मध्ये 6.3 इंचांचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, फोनच्या स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी ए19 बायोनिक चिपसेट दिले आहे.