अमेरिकेत विकले जाणार आयफोन ’मेड इन इंडिया’

जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन हे ’मेड इन इंडिया’ असतील, असे अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी म्हटले आहे. अमेरिकेत विकले जाणारे जवळजवळ सर्व आयपॅड, मॅक, अ‍ॅपल घड्याळे आणि एअरपॉड्स आता व्हिएतनाममध्ये बनवले जातील, असे कूक यांनी अ‍ॅपलचा दुसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध करताना सांगितले. जूनच्या तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन हिंदुस्थानातून येतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. हिंदुस्थानसह जगभरात अ‍ॅपलची क्रेझ आहे. आयफोन असोत किंवा स्मार्टवॉच अ‍ॅपलची उत्पादने खूप लोकप्रिय आहेत. तिमाही अहवालानुसार, अनेक देशांमध्ये जानेवारी-मार्चमध्ये अ‍ॅपलने विक्रमी वाढ नोंदवली असून कंपनी जगभरात नवीन स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. अ‍ॅपलने या तिमाहीत दोन नवीन रिटेल स्टोअर्स उघडले. मार्च तिमाहीत अ‍ॅपलच्या महसुलात वार्षिक आधारावर 5 टक्क्यांनी वाढ झाली.