IPL 2019 एक ‘टीप’वर बुकीने कमावले 65 कोटी रूपये

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ते IPL सामन्यांवर खेळला जाणारा सट्टा पूर्णपणे थांबवू शकले नाहीत. एका बुकीने त्याच्या पंटर लोकांना फक्त 1 टीप देऊन 65 कोटी रुपये कमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा बुकी दुबईत बसतो आणि टेलेग्रामच्या मार्फत त्याच्या पंटर लोकांचा संपर्कात असतो असं कळालं आहे. हा बुकी एक वेबसाईटही चालवत असल्याचं उजेडात आलं आहे.

23 मार्चला आयपीएलची सुरुवात झाली होती. ही स्पर्धा सुरु होताच जगभरातील पंटरांनी या बुकीला टेलेग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. यंदाची आयपीएल कोण जिंकणार याची टीप या बुकीने या सगळ्यांना दिली होती. 26 मार्चला त्याने सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपरकिंग्ज हे संघ सामना जिंकतील असं सांगितलं होतं. यानुसार त्यांनी सामन्यांवर जुगार खेळावा असा त्याचा सल्ला होता. या एका टीपसाठी त्याने 65 हजार रूपये प्रत्येक पंटरकडून घेतले होते. या बुकीचे जगभरात 10 हजार पंटर आहेत.

या बुकीने जमा झालेल्या 65 कोटींपैकी 10 कोटी दुसऱ्या बुकीमार्फत एका संघावर लावले होते. यामध्ये तो जिंकला का हरला हे मात्र कळू शकलेलं नाही. या बुकीने इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठीही आपला दर जाहीर केला आहे. ज्यांनी आयपीएलमध्ये 65 हजार रूपये दिले होते त्यांचा सवलतीच्या दरात टीप मिळणार आहे. या पंटर लोकांना आता विश्वचषकासाठी 40 हजार रूपये द्यावे लागतील. नव्या पंटरना मात्र 65 हजार रूपयेच द्यावे लागतील. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा बुकी अंतिम चार संघ कोण असतील याची नावे सांगणार आहे. नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.