
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल आठ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. साहजिकच त्याचा परिणाम आयपीएलच्या वेळापत्रकावर झाला. 25 मे रोजी अंतिम सामना खेळला जाणार होता. परंतु आठ दिवस स्पर्धा थांबल्यामुळे या तारखेत बदल करण्यात आला आहे. मंगळवारी (20 मे 2025) BCCI ची बैठक पार पडली असून यामध्ये पहिला क्वालिफायर सामना, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत.
BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. तसेच एलिमिनेटर सामना 30 मे रोजी खेळला जाईल. हे दोन्ही सामने न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. सामने कोणत्या स्टेडियमवर खेळले जाणार हे पावसावर अवलंबून असल्यामुळे अद्याप त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. तर, आयपीएल 2025 च्या फायनलचा थरार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 जून रोजी रंगणार आहे. क्रिकबझने यासंदर्भात वृत्त दिले आहे.