दिल्लीची लखनौवर पुन्हा मात, मुकेश कुमारचा भेदक मारा

दिल्लीने आयपीएलमध्ये आणखी एक धमाका करताना लखनौवर परतीच्या सामन्यातही मात केली. मुकेश कुमारने 33 धावांत 3 विकेट गारद करताना लखनौचा डाव 159 धावांवर रोखल्यानंतर विजयी लक्ष्य 18 व्या षटकांत गाठत आयपीएलमधील आपला सहावा विजय नोंदवला. दिल्लीने 12 गुण पटकावले असून तो नेट रनरेटच्या बाबतीत दुसऱया स्थानावर आहे.

लखनौचे 160 धावांचे आव्हान दिल्लीला खूपच छोटे वाटले. सलामीवीर अभिषेक पोरेलने 51 धावांची खेळी करताना 36 धावांच्या सलामीनंतर के. एल. राहुलसह 69 धावांची भागी रचली. पोरेल-राहुलच्या भागीनेच हा सामना दिल्लीच्या खिशात घातला होता. या यशस्वी भागीनंतर राहुलने तिसरे अर्धशतक ठोकताना हंगामातील 300 धावांचा टप्पाही गाठला. त्याने 65 धावांच्या सरासरीने 323 धावा केल्या आहेत. मग राहुलची जोडी कर्णधार अक्षर पटेलसह जमली. दोघांनी अभेद्य खेळ करताना 56 धावांची भागी रचत आपल्या सहाव्या विजयावरही शिक्कामोर्तबही केले. या विजयासह दिल्लीचे अंतिम चार संघांतील स्थानही अधिक भक्कम झाले. पुढील सहापैकी दोन सामन्यांतील विजय त्यांचा प्ले ऑफ प्रवेश निश्चित करील.

लखनौच्या फलंदाजांनी घात केला

एडन मार्परम (52) आणि मिचेल मार्श (45) यांनी दहा षटकांत 87 धावांची सलामी देत लखनौला खणखणीत सुरुवात करून दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर लखनौच्या फलंदाजांनी घात केला. त्यातच मुकेश कुमारच्या भेदक माऱ्याने लखनौच्या डावाला 159 धावांवर रोखले. स्टार्पने निकोलस पूरनची विकेट काढत मोठे यश मिळवले. मग मुकेशने एकाच षटकात अब्दुल समद आणि मिचेल मार्शची खेळी संपवत लखनौला अडचणीत आणले. दिल्लीच्या स्टार्प, मुकेश आणि चमीरा या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात कसून मारा करत लखनौच्या चौकार-षटकारांना नियंत्रित केले आणि अर्धी लढाई जिंकली.