आयपीएलवर मॅच फिक्सिंगचा यॉर्कर, राजस्थानने लखनौविरुद्ध जिंकणारा सामना गमावल्याचा आरोप

आयपीएलचे सामने पाहून प्रेक्षकांच्या मनात वारंवार शंकेची पाल चुकचुकतच असते, पण आयपीएलचा 18 वा हंगाम अर्ध्यावर आलेला असताना राजस्थान रॉयल्स संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्याने हिंदुस्थानी क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानच्या पराभवावर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी जयदीप बिहानी यांनी राजस्थानवर मॅच फिक्सिंगचा यॉर्कर टाकल्यामुळे अवघे क्रिकेट विश्व खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशीही व्हावी, अशी मागणीही बिहानी यांनी करत आयपीएलच्या थरारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

राजस्थानमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयदीप बिहानी यांनी हा मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘हा सामना राजस्थानच्या हातात होता. ते सहज विजय मिळवू शकत होते, मात्र या सामन्यात राजस्थानचा अनपेक्षितपणे पराभव झाला. ध्रुव जुरेल आणि शुभम दुबे असे धडाकेबाज फलंदाज खेळपट्टीवर असताना हा पराभव झाला. त्यामुळे या सामन्याला नक्कीच मॅच फिक्सिंगचा वास आहे. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी बोलताना केली. राजस्थानला अखेरच्या षटकात विजयासाठी केवळ 9 धावांची गरज होती. आवेश खानने अखेरच्या षटकात शिमरॉन हेटमायरला बाद करून जुरेल आणि दुबे यांनाही आपल्या यॉर्करच्या अस्त्राने नामोहरम केले, मात्र राजस्थानचा हा पराभव नक्कीच मनाला पटणारा नाही. त्यामुळे या सामन्यात मॅच फिक्सिंग झाली की नाही,’ याचा तपास होणे गरजेचे असल्याची मागणी जयदीप बिहानी यांनी केली आहे.

जयदीप बिहानी यांनी मॅच फिक्सिंगच्या आरोपासह राजस्थान रॉयल्स, राजस्थान स्पार्ट्स कौन्सिल आणि बीसीसीआय यांच्यावरही संगनमताचा आरोप केला होता. या सर्वांनी मिळून आयपीएलशी संबंधित कामांमध्ये राजस्थान क्रिकेट असोसिएशनला वेगळे करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही ते म्हणाले.

आरोपाविरुद्ध राजस्थान रॉयल्सची ‘बीसीसीआय’कडे धाव

राजस्थान रॉयल्स संघव्यवस्थापनाने मॅच फिक्सिंगचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. टीमचे वरिष्ठ अधिकारी दीप रॉय यांनी जयदीप बिहानी यांनी केलेले विधान खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. या आरोपांच्या संदर्भात राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाने आक्रमक पवित्रा घेत ‘बीसीसीआय’ व राजस्थान सरकारच्या क्रीडा विभागाला पत्र लिहून बिहानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘बीसीसीआय’ला लिहिलेल्या पत्रात राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, ‘आम्ही हे सर्व आरोप फेटाळतो. अशी विधाने केवळ दिशाभूल करणारी नाहीत, तर राजस्थान रॉयल्स संघ, आरएमपीएल, राजस्थान रॉयल्स स्पोर्ट्स कौन्सिल आणि बीसीसीआय यांच्या प्रतिष्ठेलाही गंभीर धक्का पोहोचवतात. त्यांनी क्रिकेट खेळाच्या अखंडतेला कलंकित केले आहे. बिहानी यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

शेवटच्या षटकात काय घडले…

शेवटच्या सहा चेंडूंत राजस्थानला अवघ्या 9 धावांची गरज होती. मैदानात हेटमायर आणि जुरेल हे धडाकेबाज होते. पण गोलंदाज आवेश खानच्या सहा चेंडूंवर राजस्थानच्या हेटमायर, जुरेल आणि दुबे या फलंदाजांना 1, 2, विकेट, 0, 2 आणि 1 धाव काढता आली आणि लखनौने राजस्थानच्या तोंडातून विजयाचा घास खेचून घेतला. एका षटकात 30 धावा निघत असताना राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांन केवळ 9 धावाही काढल्या आल्या नाहीत. राजस्थानचा हा पराभव साऱ्यांसाठीच अनपेक्षित होता. यामुळे या सामन्याबाबत क्रिकेटप्रेमींच्या मनात उलटसुलट चर्चा रंगू लागली होती.