
दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअरने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काहींना हा प्रयोग घातकी वाटत होता तर काहींना तो हवाहवासा वाटला. मात्र अकरा खेळाडूंच्या क्रिकेटचे बारा वाजवणाऱ्या इम्पॅक्ट प्लेअरचा प्रभाव यंदाच्या आयपीएलमध्ये अक्षरशः नाहीसा झाल्याचे गेल्या 39 सामन्यात दिसलेय. बोटावर मोजता येतील इतके सामनेच इम्पॅक्ट प्लेअरचा प्रभाव दिसल्यामुळे या बाराव्या खेळाडूचे यंदाच्या मोसमात बारा वाजलेत, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.
रोहितचा अयशस्वी इम्पॅक्ट
दोन वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर या प्रयोगाची सुरू झाल्यापासून सामन्यात धावांचा डोंगर सहज उभा राहू लागला. गेल्या वर्षी तर काही संघ या प्रयोगाचा फायदा उठवत 300 धावांच्या आकडय़ापर्यंतही पोहोचले होते. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याचा सर्वच संघांचा विशेष करून इम्पॅक्ट प्लेअरचा एककलमी कार्यक्रम असायचा. मात्र यावेळी रोहित शर्मा, मिचेल मार्श, संजू सॅमसन, ट्रव्हिस हेड, शिवम दुबेसारख्या खेळाडूंनी फक्त फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. मात्र या सार्याच खेळाडूंना आपला अर्धा इम्पॅक्टही पाडता आलेला नाही. रोहित शर्मा तर अवघ्या एकाच डावात आपला प्रभाव पाडू शकला. उर्वरित सर्व सामन्यात त्याला आपल्या आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. एवढेच नव्हे तर दुसऱया डावात रोहितऐवजी गोलंदाजीसाठी उतरलेल्या गोलंदाजांनाही निराश केले.
गोलंदाजही इम्पॅक्टशून्य
मुळात इम्पॅक्ट प्लेअर हा प्रयोग फलंदाजांसाठी फायदेशीर मानला जात असला तरी तो तितकाच गोलंदाजांसाठीही फायद्याचाच आहे. मात्र या मोसमात दोन-तीन सामने वगळता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजही इम्पॅक्टशून्यच ठरले आहेत. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये खलिल अहमद आणि वैभव अरोरा यांचे नाव विशेष घ्यावे लागेल. कोलकात्याने हैदराबादविरुद्धच्या लढतीत फलंदाजीला अंगक्रिष रघुवंशीला (50) संधी दिली होती तर गोलंदाजीत वैभव अरोराला उतरवले आणि त्याने 3 विकेट टिपत हैदराबादचा डाव 120 धावांत गुंडाळला. या माऱयाने कोलकात्याला विजय मिळवून दिला आणि वैभव ‘सामनावीर’ही ठरला. इम्पॅक्ट प्लेअरने सामना जिंकून दिलाय, हे पाहण्याचे भाग्य यंदा एक-दोन वेळाच लाभले. इम्पॅक्ट म्हणून खेळलेले दोन्ही खेळाडू यशस्वी ठरलेत हेसुद्धा यंदा दिसले नाही. खरं सांगायचे तर यंदा इम्पॅक्ट प्लेअर ही एक लॉटरी ठरली असून ती दहामध्ये एखाद्या भाग्यवानालाच लागलीय.
संघ मालकांवरही इम्पॅक्ट दिसणार
इम्पॅक्ट प्लेअर कसा असावा हा सर्व संघांच्या रणनीतीचाच एक भाग आहे. तो गेल्या मोसमात फारच इम्पॅक्टफुल ठरला होता, मात्र यावेळी त्याचा प्रभाव शून्य करण्यासाठी सर्व संघांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरताना दिसतेय. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरला शमवण्यासाठी प्रत्येक संघ वेगळी रणनीती अमलात आणत असल्याचे चित्र वारंवार दिसतेय. इम्पॅक्ट प्लेअरच्या प्रयोगावर हिंदुस्थानच्याच अनेक दिग्गजांनी टीका केली होती. मात्र या प्रयोगावर संघमालक बेहद्द खूश असल्यामुळे बीसीसीआयने हा नियम 2027 सालापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे ठरले असले तरी तो कायम ठेवायचा की नाही, याबाबत बीसीसीआयला पुन्हा विचार करावा लागू शकतो, असे अंदाज क्रिकेटतज्ञांनी वर्तवले आहे.