ब्रॅण्ड धोनी, आता वर येऊन खेळ! डिव्हिलियर्सचा धोनीला थेट सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचा चेहरा आणि ब्रॅण्ड महेंद्रसिंग धोनी पुन्हा चर्चेत आला आहे. पण यावेळी कौतुकासाठी नव्हे, तर त्याच्या भूमिकेवरच थेट प्रश्न उपस्थित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने कोणताही आडपडदा न ठेवता धोनीला स्पष्ट शब्दांत सुनावलं. “आता खाली नाही, वर येऊन खेळ.’’ त्याचा हा थेट सल्ला धोनी किती मनावर घेतो, ते लवकरच दिसेल.

गेल्या दोन-तीन मोसमांत धोनी आठव्या-नवव्या क्रमांकावर उतरतोय. पण ही भूमिका ना त्याच्या दर्जाला शोभते, ना संघाला उपयोगी ठरतेय, असं डिव्हिलियर्सचे परखड मत आहे. धोनी अजूनही सामना फिरवू शकतो, पण तो इतक्या खाली येतो की त्याला वेळच मिळत नाही, असेही सांगत त्याने धोनीला भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला दिलाय.

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, सीएसके आणि धोनी हे समीकरण मजबूत आहे यात शंका नाही. पण केवळ ‘ब्रॅण्ड’ टिकवण्यासाठी संघात राहणं योग्य नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. “धोनी म्हणजे सीएसके ही ओळख खरी आहे, पण मैदानावर योगदान नसेल तर त्या नावाला काय अर्थ?’’ असा रोखठोक सवालही त्याने उपस्थित केला.

डिव्हिलियर्सच्या मते, धोनीने आता स्वतःवर दबाव घेऊन सहाव्या क्रमांकावर तरी खेळावे, गरज पडल्यास चौथ्या-पाचव्या क्रमांकावरही येऊन आपला झंझावात दाखव. महत्त्वाच्या क्षणी पुढे येऊन सामना संपव. हीच खरी त्याची ओळख आहे, असेही त्याने ठणकावून सांगितले.

दरम्यान, संघाच्या भविष्यासाठी संजू सॅमसनसारख्या खेळाडूला पुढे आणण्याचा निर्णय योग्य असल्याचेही त्याने सांगितले. पण आता सर्वांची नजर एकाच गोष्टीवर आहे. धोनी ब्रॅण्ड म्हणून राहणार की पुन्हा एकदा मैदान गाजवणार? आयपीएलमध्ये याचं उत्तर मिळणार आहे.