IPL 2026 – थाला पुन्हा मैदानात आला! पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नई विजयाचे खाते उघडणार? चाहत्यांचा उत्साह शिगेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानने धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात चेन्नईची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. मात्र, चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा कणा आणि माजी कर्णधार एमएस धोनी दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा मैदानात परतला आहे.

महेंद्र सिंग धोनी स्नायूंच्या दुखापतीमुळे हंगामातील पहिल्या दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर होता. या दुखापतीमुळेच तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता, जिथे चेन्नईला 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला. धोनीच्या अनुपस्थितीत संघाची रणनीती कोलमडलेली पाहायला मिळाली होती. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर संघ बॅकफुटवर होता. याचाच राजस्थानने फायदा करून घेतला आणि सामनाही खिशात घातला.

चेन्नईचा चेपॉक स्टेडियमवर 3 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी 1 एप्रिल रोजी झालेल्या सराव सत्रात धोनीने नेट्समध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. त्याच्या फलंदाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनी खेळणार की नाही, याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी, त्याच्या सरावामुळे तो लवकरच मैदानात दिसेल अशी चिन्हे आहेत.

IPL 2026 – तो पूर्णपणे फिट आहे, चिंता करू नका! अय्यरच्या दुखापतीवर चहलचे मलम

चेन्नईचा पंजाबविरुद्धचा पेपर सोपा नसेल, कारण आकडेवारीचा विचार करता पंजाबचं पारड जड मानलं जात आहे. चेन्नई आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी 16-16 सामने जिंकले आहेत. मात्र, चेपॉक स्टेडियमचा विचार करता पंजाब चेन्नईच्या एक पाऊल पुढे आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत दोन्ही संघ 9 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये 5 सामने पंजाबने आणि 4 सामने चेन्नईने जिंकले आहेत.