
IPL 2026 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. दोन चेंडूंमध्ये दोन धावांची गरज होती. स्ट्राईकला डेव्हिड मिलर होता. सामना दिल्ली जिंकणार हे चाहत्यांनी जवळपास निश्चित केलं होतं. मात्र, दोन धावा करण्यात मिलरला अपयश आलं आणि दिल्लीच्या हातातला सामना निसटून गुजरातच्या पारड्यात पडला. षटकातील पाचव्या चेंडूवर धाव न घेण्याच्या मिलरच्या निर्णयावर सध्या टीका केली जात आहे. मात्र, दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने याचं कारण सांगत मिलरची पाठराखण केली आहे.
दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने या पराभवानंतर आपली निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “आम्ही सर्वजण सध्या दुखी आहोत, पण ही एक मोठा टूर्नामेंट आहे आणि आम्हाला सकारात्मक राहावे लागेल. मी सुरुवातीलाच सांगितले होते की आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचे आहे. जर मिलरने ते षटकार मारले नसते, तर आम्ही सामन्यात टिकलोच नसतो. आता आम्ही हा पराभव मागे टाकून चेन्नईत नव्या उमेदीने मैदानात उतरू.”
दिल्लीला शेवटच्या 12 चेंडूत 36 धावांची गरज होती. 19व्या षटकात डेव्हिड मिलरने सिराजच्या गोलंदाजीवर 23 धावा कुटल्या, ज्यामुळे समीकरण 6 चेंडूत 13 धावांवर आले. शेवटच्या षटकात विपरज निगम बाद झाल्यानंतर कुलदीप यादवने मिलरला स्ट्राईक दिली. मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर षटकार मारत विजयाचे समीकरण 2 चेंडूत 2 धावा असे सोपे केले. मात्र, पुढच्या चेंडूवर धाव घेण्यास मिलरने नकार दिला आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो चुकला. शेवटच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादव धावबाद झाला आणि गुजरातने हा सामना खिशात घातला.





























































