IPL 2026 – गुजरात टायटन्सचे फलंदाज युझवेंद्र चहलच्या फिरकीपुढे हतबल, अनिल कुंबळेने केले कौतुक; म्हणाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 च्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) गुजरात टायटन्सचा (GT) तीन गडी राखून पराभव केला. पंजाबच्या या विजयात अनुभवी लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाख यांनी मोलाची भूमिका बजावली. दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने चहलच्या ‘टॅक्टिकल’ खेळाची प्रशंसा करताना म्हटले की, त्याने योग्य वेळी घेतलेल्या विकेट्समुळे पंजाबला विजयाचा मार्ग सोपा झाला.

अनिल कुंबळेच्या मते, चहलने परिस्थितीचा अचूक अंदाज घेत चेंडूच्या गतीमध्ये आणि लांबीमध्ये केलेले बदल कौतुकास्पद होते. चहलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 28 धावा देत शुभमन गिल आणि जोस बटलर यांसारख्या मोठ्या फलंदाजांना बाद केले. कुंबळे म्हणाला, “चहल अत्यंत हुशार गोलंदाज आहे. त्याने मैदानाची मोठी बाजू ओळखून फलंदाजांना जाळ्यात ओढले. गिल सेट झाला होता, पण चहलने त्याला बाद करून गुजरातची लय तोडली.” विजयकुमार वैशाखनेही भेदक मारा करत 34 धावांत 3 बळी घेतले, ज्यामुळे गुजरातला 162 धावांवर रोखणे शक्य झाले.

IPL 2026 – ‘5000 रुपये लावून बघा, बुडतील की काय या भीतीने हृदय धडधडतं’; लखनऊच्या मालकाच्या समर्थनार्थ मोहम्मद शमी मैदानात

एकीकडे पंजाबच्या गोलंदाजांचे कौतुक होत असताना, कुंबळेने गुजरात टायटन्सच्या रणनीतीवर टीका केली. गेल्या हंगामातील ‘पर्पल कॅप’ विजेता प्रसिद्ध कृष्णा याला 13 व्या षटकापर्यंत गोलंदाजी न देणे ही मोठी चूक असल्याचे कुंबळेने नमूद केले. प्रसिद्धने आपल्या स्पेलमध्ये शशांक सिंगसारख्या फलंदाजाला बाद केले, मात्र त्याला उशिरा गोलंदाजीला आणल्यामुळे अखेरच्या षटकात त्याने 14 धावा दिल्या. “प्रसिद्धला किमान एक ओव्हर 6 ते 10 षटकांच्या दरम्यान द्यायला हवी होती,” असे मत कुंबळेने ‘जिओहॉटस्टार’वर बोलताना व्यक्त केले.