IPL 2026 – पंजाबच्या किंग्जने केली हैदराबादची शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव करीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत तिसऱया विजयाची नोंद केली. हैदराबादकडून मिळालेले 220 धावांचे लक्ष्य पंजाबने 6 फलंदाज आणि 7 चेंडू राखून 18.5 षटकांत 4 बाद 223 धावा करीत पूर्ण केले. नाबाद 69 धावांची खेळी करणारा कर्णधार श्रेयस अय्यर हा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हैदराबादचा चार लढतीतील तिसरा पराभव ठरला.

प्रियांश-प्रभसिमरन यांची अर्धशतके

हैदराबादकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रियांश आर्य (57) व प्रभसिमरन सिंग (51) यांनी आक्रमक अर्धशतके ठोकून पंजाबच्या विजयाची पायाभरणी केली. प्रियांशने 20 चेंडूंत 5 षटकार व तितकेच चौकार ठोकले, तर प्रभसिमरनने 25 चेंडूंत 4 षटकार अन् तितकेच चौकार लगावले. या दोघांनी 38 चेंडूंत 99 धावांची भागीदारी करीत हैदराबादचे गोलंदाज निष्प्रभ ठरविले. शेवटी शिवांग कुमारनेच या दोघांना बाद करून ही जोडी माघारी पाठविली.

श्रेयस अय्यरची मॅचविनिंग खेळी

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर कुपर कोनोली (11) लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीची सूत्रे हाती घेत हैदराबादच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्याने 33 चेंडूंत 5 टोलेजंग षटकार व तितकेच सणसणीत चौकार ठोकून नाबाद 69 धावांची खेळी करीत अवघड वाटणारा विजय सोपा केला. नेहाल वढेरा 14 धावांवर बाद झाल्यानंतर शशांक सिंगने नाबाद 16 धावा करीत श्रेयसला साथ दिली. हैदराबादकडून शिवांग कुमारने 3, तर हर्ष दुबेने एक फलंदाज बाद केला.

मधल्या फळीचा फ्लॉप शो

हैदराबादचा संघ आज अडीचशे धावांचा टप्पा गाठणार असे वाटत होते. मात्र, सलामीची जोडी तंबूत परतताच इतर फलंदाजांनी फटकेबाजी केली नाही. कर्णधार ईशान किशन (27), हॅन्रीच क्लासेन (39), अंकित वर्मा (9) या मधल्या फळीने अडखळत फलंदाजी केल्याने हैदराबादला 219 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग, शशांक सिंग यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर झेव्हियर बार्टलेटला एक बळी मिळाला.

अभिषेक शर्माची वादळी खेळी

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 219 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात अभिषेक शर्मा (74) व ट्रव्हिस हेड (38) यांनी 50 चेंडूंत 120 धावांची खणखणीत सलामी देत सनरायझर्स हैदराबादला झकास सुरुवात करून दिली. हेडने 23 चेंडूंत 5 चौकार व एका षटकार ठोकला. शशांक सिंगने त्याला बार्टलेटकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. मात्र, एका बाजूने अभिषेक शर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने 28 चेंडूंत 74 धावांची वादळी खेळी करताना 8 षटकारांसह 5 चौकारांचा घणाघात केला. शशांक सिंगनेच अर्शदीपकरवी झेलबाद करून अभिषेकचे वादळ शांत केले.