IPL 2026 – सामना पाहायला यायचं का नाही? चाहत्यांचा संताप; एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर चोरट्यांचा धुमाकूळ, अनेकांचे मोबाईल लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान शेकडो चाहत्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे रंगतदार सामना सुरू होता. मात्र, दुसरीकडे स्टेडियममधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनवर डल्ला मारला आहे. विशेषतः दुसऱ्या डावात प्रेक्षकांची हालचाल वाढत असताना आणि लोक पाणी किंवा नाश्त्यासाठी बाहेर येत असताना या चोरीच्या घटना घडल्या. स्टेडियमच्या आतल्या स्टँडसह मेट्रो स्टेशन आणि कब्बन पार्क सारख्या सार्वजनिक ठिकाणीही अनेक चाहत्यांचे फोन चोरीला गेले आहेत. त्यामुळे सामना पाहायला यायचं का नाही? असा संतप्त सवाल चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणाची दखल घेत पोलीस उपायुक्त अक्षय हाके यांनी सांगितले की, आतापर्यंत 30 फोन चोरीला गेल्याची अधिकृत तक्रार प्राप्त झाली असून काही अल्पवयीन मुलांसह संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि सोशल मीडियावरील दाव्यांनुसार ही संख्या अधिक असू शकते. रितू तिवारी या कंटेंट क्रिएटरने व्हिडीओ शेअर करत असा दावा केला आहे की, एकट्या ‘P3’ स्टँडमधून 50 ते 60 फोन चोरीला गेले आहेत. स्टेडियममधील गर्दीत जर्सी घालून वावरणाऱ्या काही संशयास्पद मुलांकडून हे कृत्य केले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL 2026 – लहाणपणीच आईचं छत्र हरवलं, काकांचा त्याग अन् हैदराबादच्या अनिकेत वर्माचा धमाका; वाचा त्याचा संघर्षमय प्रवास…

चाहत्यांनी कब्बन पार्क पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या असून कर्नाटक पोलीस ॲपद्वारे ‘ई-लॉस’ रिपोर्टही दाखल केले आहेत. पीडितांच्या मते, ही एक संघटित गुन्हेगारी असू शकते, कारण अशाच प्रकारच्या घटना चेन्नई आणि वानखेडे स्टेडियमवरही घडल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस स्टेडियममधील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, याचा शोध घेत आहेत.