युद्ध आणि निवडणुकांच्या छायेत आयपीएल; अडथळ्यांच्या वादळातही IPL साठी बीसीसीआय सज्ज, 28 मार्चपासून फटकेबाजी, पहिल्या 20 लढतींचा कार्यक्रम जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका बाजूला पश्चिम आशियातील युद्धाचे सावट, तर दुसऱ्या बाजूला देशातील विधानसभा निवडणुकांची धामधूम. अशा दुहेरी संकटांच्या छायेतही आयपीएल 2026 ची रणधुमाळी सुरू करण्यासाठी बीसीसीआयला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व अडचणींवर मात करत बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 28 मार्चला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या फटकेबाजीचा बार उडवला जाईल.

सुरक्षेच्या कसोटीवर बंगळुरू

कार्यक्रम जाहीर झाला असला तरी बंगळुरूतील सामने कर्नाटक सरकारने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीच्या मंजुरीवर अवलंबून आहेत. मागील हंगामात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीनंतर सुरक्षेच्या व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यासाठी 13 मार्च रोजी समितीची बैठक होणार आहे. समितीच्या अहवालानंतरच येथे सामने खेळवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

युद्धाचा प्रवासावर परिणाम

पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. दोहा आणि दुबईसारख्या प्रमुख विमानतळांवरील उड्डाणांवर निर्बंध आल्याने दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचे काही खेळाडू अद्याप मायदेशी पोहोचलेले नाहीत. त्यामुळे आयपीएलसाठी त्यांना वेळेत हिंदुस्थानात आणणे हे मोठे आव्हान बनले आहे. युद्धामुळे विमानभाडेही मोठय़ा प्रमाणात वाढले असल्याने खेळाडूंच्या प्रवासाचे नियोजन करणे बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरत आहे.

निवडणुकांमुळे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक

तामीळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सध्या केवळ पहिल्या टप्प्यातील 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवडणुकांच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतर स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल.

वानखेडेवर दुसऱयाच दिवशी थरार

उद्घाटन सामन्यानंतर दुसऱयाच दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येणार आहेत. पहिल्या 16 दिवसांत चार डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएलचे पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक

28 मार्च     बंगळुरू वि. हैदराबाद     बंगळुरू

29 मार्च     कोलकाता वि. मुंबई          मुंबई

30 मार्च     राजस्थान वि. चेन्नई      गुवाहाटी

31 मार्च     पंजाब वि. गुजरात        मुल्लानपूर

1 एप्रिल     लखनौ वि. दिल्ली        लखनौ

2 एप्रिल     कोलकाता वि. हैदराबाद    कोलकाता

3 एप्रिल     चेन्नई वि. पंजाब           चेन्नई

4 एप्रिल     मुंबई वि. दिल्ली           दिल्ली

4 एप्रिल     गुजरात वि. राजस्थान     अहमदाबाद

5 एप्रिल     बंगळुरू वि. चेन्नई         बंगळुरू

5 एप्रिल     हैदराबाद वि. लखनौ         हैदराबाद

6 एप्रिल     कोलकाता वि. पंजाब        कोलकाता

7 एप्रिल      मुंबई वि. राजस्थान        गुवाहाटी

8 एप्रिल     गुजरात वि. दिल्ली        दिल्ली

9 एप्रिल     कोलकाता वि. लखनौ       कोलकाता

10 एप्रिल  राजस्थान वि. बंगळुरू        गुवाहाटी

11 एप्रिल  चेन्नई वि. दिल्ली           चेन्नई

11 एप्रिल  पंजाब वि. हैदराबाद                 मुल्लानपूर

12 एप्रिल  मुंबई वि. बंगळुरू         मुंबई

12 एप्रिल  लखनौ वि. गुजरात       लखनौ