नवा प्रायोजक शोधण्यासाठी बीसीसीआयला करावी लागणार तारेवरची कसरत

667

विवो या चिनी कंपनीने बीसीसीआयसोबतचा करार मोडीत काढून आयपीएल प्रायोजकपदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आगामी स्पर्धेआधी बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. तसेच 19 सप्टेंबरला आयपीएल स्पर्धा यूएईत सुरू होणार असून त्याआधी फक्त 43 दिवसांचा अवधी उरला आहे. इतक्या कमी अवधीत बीसीसीआयला नवा प्रायोजक शोधावा लागणार आहे. विवोने माघार घेतल्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला 50 कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

2199 कोटींचा पाच वर्षांसाठी करार

विवोआधी बीसीसीआयचा पेप्सी या कंपनीसोबत करार केला होता. हा करार 396 कोटींचा होता. मात्र 2017 सालापासून बीसीसीआयने विवोसोबत पाच वर्षांसाठी 2199 कोटींचा करार केला. या करारानुसार बीसीसीआयला वर्षाला 440 कोटी मिळत होते. आता या वर्षासाठीचा करार मोडीत निघाल्यामुळे पुढच्या वर्षी विवोकडून कोणते पाऊल उचलण्यात येते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयची यावेळी भूमिका काय असते हेही पाहणे रंजक ठरेल.

स्पॉन्सरशिप, गेट महसुलावर पाणी 

विवोसोबत केलेल्या करारानुसार जी रक्कम मिळणार होती ती बीसीसीआय व संघ मालक यांच्यामध्ये शेअर करण्यात येत असे. विवोकडून बीसीसीआयला वर्षाला 440 कोटी मिळतात. याप्रमाणे बीसीसीआयला 220 तर संघ मालकांनाही तेवढेच 220 कोटी देण्यात येत आहेत. म्हणजे एका संघ मालकाला त्याचे 28 कोटी रुपये मिळतात. तसेच आता आयपीएल स्पर्धेतील लढती फक्त टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांसाठी असणार आहेत. त्यामुळे गेट व स्टेडियममधील महसुलाला मुकावे लागणार आहे. याचे संघ मालकांना प्रत्येकी 3 ते 4 कोटींप्रमाणे सर्व लढतींचे एकूण 21 त 24 कोटी मिळतात. आता विवोने माघार घेतल्यामुळे संघ मालकांना प्रत्येकी 50 ते 52 कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या