बीसीसीआयला जोरदार धक्का, विवोने आयपीएलचे प्रायोजकत्व काढले

2225

हिंदुस्थान आणि चीनमधील तणावपूर्ण वातावरणाचा फटका आता बीसीसीआयला बसला आहे. 13 व्या आयपीएलच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेल्या विवो कंपनीने बीसीसीआय बरोबरचा करार मोडत या स्पर्धेच्या प्रायोजक पदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयला यंदाच्या हंगामासाठी नवा प्रायोजक शोधावा लागणार आहे.

बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात आयपीएलचा 13 वा हंगाम खेळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. यंदा ही स्पर्धा युएईमध्ये भरविण्यात येणार असून त्यासाठी प्रायोजक म्हणून विवो या चिनी मोबाईल कंपनीची निवड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थान आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्ष लक्षात घेता विवोने या हंगामासाठी हा करार मोडीत काढला आहे. त्यानुसार 13 व्या हंगामासाठी विवो आयपीएलच्या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून काम करणार नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त या हंगामासाठी विवोने माघार घेतल्याचे कळते. त्यानंतर पुढील हंगामासाठी विवो पुन्हा प्रायोजकपद स्वीकारणार असल्याचे कळते.

बीसीसीआयवर झाली होती टीका

या स्पर्धेसाठी विवोला प्रायोजक म्हणून कायम ठेवल्याने बीसीसीआयला सोशल मीडियावर टीका सहन करावी लागली होती. हिंदुस्थानात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झाले असताना बीसीसीआयनेदेखील हे प्रायोजक पद सोडावे अशी मागणी होऊ लागली होती. मात्र ही मागणी झुगारून बीसीसीआयने प्रायोजक म्हणून विवोची निवड केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या