इराण युद्धाचा काटा ट्रम्प यांच्या घशात अडकला; लढाई थांबेना, अमेरिकेत अस्वस्थता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धाचा काटा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घशात अडकला आहे. इराणवर हल्ला करण्याच्या त्यांच्या निर्णयावर अमेरिकेतून टीका होत आहे. संपूर्ण जग होरपळून निघत असताना अमेरिकेपर्यंतही युद्धाच्या झळा पोहोचल्या आहेत. अमेरिकेत गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे दर सरासरी 3.61 डॉलरने वाढले आहेत. इराणकडून होणारा कडवा प्रतिकार ट्रम्प यांना अनपेक्षित होता. इराणमध्ये सत्तांतर घडविणे अमेरिकेला वाटते तेवढे सोपे नाही, असा खुद्द अमेरिकेच्याच एका अहवलात दावा करण्यात आला आहे. त्यातच युद्ध दिवसेंदिवस लांबत चालल्यामुळे अमेरिकेत आता प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही, असे नमूद करत अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी निशाणा साधला.

इराण युद्धामुळे हिंदुस्थानसह अनेक देशांमध्ये गॅस आणि इंधनाचे दर वाढले आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जगाचे नाक दाबले गेले आहे. आता अमेरिकेत महागाईने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेतही इंधनाची दरवाढ झाली आहे. ट्रम्प यांनी मोठे दावे केले, तरीही युद्ध थांबण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारही कोसळले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत राजकारणात होत असून ट्रम्प यांना विरोध वाढत आहे. महागाई वाढल्यास पुढची निवडणूक जड जाईल, असे संकेत मिळत असल्यामुळे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची चिंता वाढली आहे. परिणामी ट्रम्प यांच्यावर अंतर्गत राजकीय दबाव वाढत असून नागरिकामध्येही नाराजी पसरत आहे. एकीकडे देशात वाढती नाराजी आणि दुसरीकडे इराणकडून होत असलेला प्रतिकार, यामुळे युद्धाचा काटा ट्रम्प यांच्याच घशात अडकला आहे.

बुर्ज खलिफा परिसरातील इमारतीत स्फोट

दुबईमधील जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळख असलेल्या बुर्ज खलिफा परिसरातील एका इमारतीत दोन मोठे स्पह्ट झाले. हे स्पह्ट इतके भीषण होते की आसपासच्या इमारतींनाही त्याचे हादरे बसले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र स्पह्टांचा आवाज आणि हादऱयांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या स्पह्टामुळे आर्थिक पेंद्रातील अनेक उंच इमारतींवर धुराचे लोट पसरले होते. स्पह्टाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इमारतीच्या बाहेरील भागात तांत्रिक बिघाडामुळे हे स्पह्ट झाल्याची माहिती दुबई मीडिया ऑफिसने दिली.

चीन, रशियाने अमेरिकेला सुनावले खडे बोल

इराणवर हल्ला करणे कसे योग्य होते, असे सांगण्याचा प्रयत्न करणाऱया अमेरिकेला चीन आणि रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत चांगलेच खडे बोल सुनावले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेने चीन आणि रशियावर इराणचा बचाव करत असल्याचा आरोप केला. त्यावरुन चीन आणि रशियाच्या प्रतिनिधींनी अमेरिकेवर टीका केली. चीनने म्हटले, की इराणमधील अणू संकटाला अमेरिकेनेच भडकावले आहे. इराणविरोधात वाटाघाटी करताना अमेरिकेने बळाचा वापर केला.

‘इराण हे व्हेनेझुएला नाही, ट्रम्प हल्ला करून फसले’

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना उचलून थेट अमेरिकेत नेले होते. मात्र, इराणने शरणागती न पत्करता जशास तसे उत्तर देत अमेरिकेला जेरीस आणले आहे. त्यामुळे  इराण हा व्हेनेझुएला नाही, असे म्हणत जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, की व्हेनेझुएलाप्रमाणेच इराणमध्येही मनाप्रमाणे सत्तांतर घडवून आणू शकतात, असे ट्रम्प यांना वाटले असेल. पण, इराण आणि व्हेनेझुएला या देशांची तुलना करणे चुकीचे आहे. ट्रम्प यांच्याकडे युद्ध हताळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन असल्याचे वाटत नाही, अशी टीका बोल्टन यांनी केली.

हिंदुस्थानसाठी होर्मुझचा मार्ग खुला

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळे हिंदुस्थानात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, हे संकट दूर होण्याची आशा पल्लवित झाली आहे. हिंदुस्थान हा इराणचा मित्र असून लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून हिंदुस्थानला मार्ग देऊ, असे इराणचे हिंदुस्थानातील राजदूत मोहम्मद फतहाली यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, की आमचे हिंदुस्थानसोबत दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आम्ही हिंदुस्थानला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्ग देऊ. पुढील 2-3 तासांमध्ये तुम्हाला तसे दिसेल, असे फतहाली यांनी स्पष्ट केले.  त्यानंतर हिंदुस्थानच्या दोन जहाजांना लगेचच परवानगी देण्यात आली आहे.

इराकमध्ये विमान कोसळले

इराकच्या पश्चिमेकडील भागात अमेरिकेच्या हवाई दलाचे ‘केसी-135’ हे विमान कोसळले. या विमानातून लढाऊ विमानांना हवेत इंधन पुरवठा करता येतो. या विमानात 6 सैनिक होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला. इराणच्या हल्ल्यात हे विमान कोसळलेले नाही, असा दावा अमेरिकेने केला आहे.

ट्रम्प म्हणतात, कॅन्सर संपवला!

इराण लवकरच शरणागतीच्या तयारीत असून आपल्या सर्वांना धाका असलेल्या कॅन्सरपासून मुक्तता मिळाली आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. जी-7 गटाच्या राष्ट्रप्रमुखांसोबत ट्रम्प यांनी दुरध्वनीद्वारे संवाद साधला. इराणमध्ये नेता कोण आहे, हेच कोणाला ठावूक नाही. त्यामुळे कोणीही आत्मसमर्पणाबाबत बोलण्याच्या तयारीत नाही, असा  दावा ट्रम्प यांनी केला. इतर नेत्यांनी ट्रम्प यांना युद्ध लवकर संपवून होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्याचा सल्ला दिला.

ओमानमध्ये दोन हिंदुस्थानींचा मृत्यू

ओमानमध्ये सोहार शहरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 10 हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले आहेत. हे सर्व तेथे एका कंपनीत कामाला होते. सोहार हे मस्कतजवळचे शहर आहे. मृतकांचे पार्थिव हिंदुस्थानात पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हिंदुस्थानी अधिकारी स्थानिक प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या संपर्कात आहेत.