
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे, तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. आता यानंतर आपण रोज वापरत असलेल्या इंटरनेटवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक इंटरनेट केबल्स लाल समुद्र आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातात. मिळालेल्या वृत्तांनुसार, इराणने या केबल्सना नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली आहे. असे झाल्यास, हिंदुस्थानसह अनेक देशांमधील इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो.
जगभरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी समुद्राखालच्या केबल्स टाकल्या जातात. अंदाजे ९५% जागतिक डेटा त्यांच्यामधून जातो. हिंदुस्थानच्या १४ लँडिंग स्टेशन्सवर अशा १७ केबल्स आहेत. युद्धामुळे केवळ केबल खराब होण्याचा धोकाच नसतो, तर त्यांच्या दुरुस्तीलाही विलंब होतो. याचा परिणाम हिंदुस्थानातील आणि अनेक युरोपीय देशांमधील इंटरनेट सेवेवर होऊ शकतो. जगातील सुमारे ९५ टक्के इंटरनेट डेटा समुद्राखालच्या केबल्समधून जातो. हिंदुस्थानातही अशा अनेक केबल्स असून, चेन्नई, मुंबई, कोची आणि तुतीकोरीनसारख्या शहरांमध्ये त्यांची केंद्रे आहेत. या केबल्स खराब झाल्या, तर इंटरनेट इतर मार्गांनी वळवता येते, परंतु यामुळे वेग कमी होऊ शकतो आणि नेटवर्कवर अधिक ताण येऊ शकतो.
सध्या दोन ठिकाणी समुद्राखालच्या इंटरनेट केबल्सना अधिक धोका आहे: होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रातील बाब-अल-मंदेब. युद्धामुळे दोन्ही भागांतील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे, तर इराण-समर्थित हुथी बंडखोर बाब-अल-मंदेबला रोखण्याची धमकी देत आहेत. लाल समुद्रातील परिस्थिती आधीच काहीशी तणावपूर्ण होती आणि आता संघर्ष सुरू झाल्याने होर्मुझची सामुद्रधुनी एक प्रमुख अडथळा बनली आहे.



























































