दिल्ली डायरी –  मोदी सरकार ‘गॅस’वर! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीलेश कुलकर्णी  

पंतप्रधान मोदींनी अकरा वर्षे फेक नरेटिव्ह रचून सरकार चालवले. मात्र एकदा घर फिरले की घराचे वासे फिरतात.’ आता मोदी चहूबाजूंनी अडचणीत सापडले आहेत. 2012 मध्ये तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारवर महागाईवरून हल्लाबोल करणारे मोदी आणि भाजप आज इराणइस्रायलअमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गॅसवरआले आहे. या सरकारला उलथून टाकण्यासाठी विरोधक आता कशी जनजागृती करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

तिहासाची पुनरावृत्ती राजकारणात होतच असते. 2012 च्या आसपास तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारविरुद्ध जनतेत विविध कारणांनी असंतोष निर्माण झाला होता. वाढती महागाई हे त्यातले एक मोठे कारण होते. हल्ली भाजपच्या विस्मृतीत गेलेल्या स्मृती इराणींसारख्या नेत्यांनी त्यावेळी गॅस सिलिंडर घेऊन केलेले महागाईविरोधी आंदोलन जनतेच्या चांगलेच स्मरणात आहे. ‘बहोत हो गयी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ अशी जाहिरात करणाऱ्या एक मावशी 2014 च्या आसपास उगवल्या होत्या, त्या अच्छे दिनची ग्वाही देत. नंतरच्या काळात नरेंद्र मोदी जितक्या प्रचंड बहुमताने सत्तेवर आले तितक्याच प्रचंड वेगाने या मावशी व अच्छे दिन गायब झाले! संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावेळी काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गॅस सिलिंडरसह आंदोलन केले. अमेरिका इस्रायल व इराणमधील भीषण युद्धामुळे मोठी गॅसटंचाई निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या फसलेल्या परराष्टनीतीमुळे देश एकाकी पडला आहे. इराणकडून गॅस व इंधन तेलाची खरेदी नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये अमेरिकेच्या दबावाखाली थांबवली. त्यामुळे भारताने इराणच्या रूपाने आपला हिंतचिंतक गमावल्याचे बोलले जाते. आज सरकारचे प्रवत्ते व गोदी मीडिया वगळता सगळ्यांनाच देशात गॅसची कमतरता आहे, याची जाणीव आहे. कधी ट्रम्प दोस्त तर कधी पुतीन मित्र, अशा गोंधळलेल्या स्थितीत मोदींनी देशाला एका विलक्षण अनिश्चिततेकडे ढकलले आहे. गॅसटंचाईवर एपस्टीनचे मित्र पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी निवेदन दिले त्याची खिल्ली उडवली गेली. देशातील गंभीर स्थिती लक्षात घेता पंतप्रधानांनी संसदेत येऊन यासंदर्भात निवेदन द्यायला हवे होते. मात्र मोदींनी ते धैर्य दाखविले नाही. मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेले आहे. इतके दिवस मोदींबद्दलचे असणारे ‘गुडविल’ संपत चालले आहे. मोदींचा डाऊनफॉल सुरू झाला आहे. 2012 प्रमाणेच देश ‘गॅस’वर आहे. त्यावेळी मनमोहन सिंग यांच्याविरुद्धची नाराजी भाजपने एन्पॅश करत सत्तेचा सोपान गाठला होता. आताही विरोधी काँग्रेसला अधिक जबाबदारीने स्थिती हाताळावी लागेल. भाजप जनतेच्या मनातून उतरत आहे हे खरे. मात्र जनतेचे मन जिंकण्याची कवायत काँगेसला करावी लागेल.

बिर्ला परत आले, पण…

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्धचा अविश्वासदर्शक ठराव सभागृहातील गदारोळामुळे मतविभाजन न घेता आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बिर्ला हे अध्यक्षपदाच्या आसनावर स्थानापन्न झाले. लोकसभा हे 140 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. नियमांविरुद्ध वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मी नेहमीच महिला खासदारांना बोलण्यासाठी प्राधान्य दिले, अशी स्वतःची पाठ बिर्ला यांनी थोपटून घेतली. सर्वसाधारणपणे लोकसभा अध्यक्षांविरोधात शक्यतो अविश्वास ठराव आणला जात नाही. परिस्थिती अगदीच असामान्य असेल तरच तसे केले जाते. दादासाहेब मावळंकर व हुकुमसिंग यांच्याविरोधातदेखील अशाच अपवादात्मक स्थितीत प्रस्ताव आला होता. मात्र बिर्लांची तुलना मावळंकर व हुकुमसिंग यांच्यासारख्या आदरणीय नेत्यांबरोबर करता येणार नाही. बिर्लांबद्दल प्रचंड तक्रारी होत्या आणि आहेत. सुरुवातीला मोदी व शहा यांच्या हुकुमाचे ताबेदार असलेल्या बिर्लांनी 2024 मध्ये लोकसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर मात्र स्वतंत्र बाण्याने काम सुरू केले होते. संपूर्ण संसद भवन हे लोकसभा सभापतींच्या अखत्यारीत असते. त्या कामांचे ऑडिटदेखील होत नाही. बिर्लांच्याच कार्यकाळात संसद सदस्यांसाठी नव्या निवासस्थांनाच्या इमारती बनल्या. त्याबद्दलही वेगवेगळ्या सुरस कहाण्या ऐकायला मिळतात. बिर्लांच्या अनेक तक्रारी नागपूर दरबारीही गेल्या होत्या. बिर्ला असे पंट्रोल होणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास ठरावाला ‘हवा’ दिली गेली आणि त्यानंतर तो फेटाळण्यात आला. आता बिर्ला पुन्हा दिल्लीकरांच्या पंट्रोलमध्ये येतील, असे सांगितले जात आहे.

औटघटकेचे जगदंबिका पाल

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास ठराव आणल्यामुळे लोकसभेचे संचालन तालिका सदस्य या नात्याने जगदंबिका पाल यांनी सांभाळले आणि ते बिर्लांच्या तुलनेत पैक पटीने चांगल्या पद्धतीने सांभाळले. त्यामुळे झाले असे की, संसद भवनातील प्रांगणात काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी जगदंबिका यांची फिरकी घेत, ‘ओम बिर्ला से तो आप बेहतर है. आपको ही स्पीकर बनाना चाहिए’ अशी गुगली टाकली. त्यावर भाजपमधील भिंतींना कान असतात हे लक्षात असल्यामुळे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी असलेल्या जगदंबिका यांनी ‘आप तो शंकर का अवतार है. सब जहर पचाते है लेकिन मेरे साथ ऐसा बोलके राजनीती ना करे,’ असे सांगितले. त्यावर ‘आप हमारे काँग्रेसी भाई है,’ असे प्रत्युत्तर दिग्विजय यांनी दिले. सोशल मीडियावर जगदंबिका-दिग्विजय यांच्यातील हा संवाद व्हायरल झाला आहे. जगदंबिका पाल हे उत्तरेच्या राजकारणातले वरिष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांच्या नशिबी नेहमीच औटघटकेची पदे आली. उत्तर प्रदेशचे एक दिवसाचे मुख्यमंत्री होण्याचा नामुष्कीवजा विक्रम त्यांच्या नावावर आहे. काँंगेसकडून दोनदा, भाजपकडून तीनदा लोकसभेवर निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलाय. अनेकदा ते विधानसभा व विधान परिषदेवरही निवडून आले. मात्र इतकी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असूनही त्यांच्या नशिबी स्थिर असे पद आलेच नाही. बिर्लांच्या जागीही ते लोकसभेत औटघटकेसाठी आले. वास्तविक, बिर्लांविरुद्धच्या अविश्वासदर्शक ठरावानंतर त्यांच्या जागी लोकसभेचे कामकाज संध्या राय सांभाळतील असे ठरले होते. मात्र राय या तेवढय़ा परिपक्व नसल्यामुळे मग ही जबाबदारी जगदंबिका यांच्यावर सोपविण्यात आली. जगदंबिका यांनी अत्यंत परिपक्वतेने ती निभावली. त्यामुळे साहजिकच दिग्विजय सिंग यांनी ‘बिर्ला को हटा कर आपको स्पीकर बनाना चाहिए’ ही केलेली टिप्पणी चांगलीच चर्चेत आली आहे.

[email protected]