
मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वांचाच सुट्टीचा प्लान ठरलेला असतो. त्यात देशातील पर्यटनस्थळांसह बजेटनुसार परदेशवारीचाही बेत अनेक कुटुंबे आखतात. मात्र आखातात भडकलेल्या युद्धामुळे जागतिक पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात ब्रेक लागला असून युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने उन्हाळी सुट्टय़ांमधील परदेशी पर्यटनाचेही बेत बोंबलणार आहेत. उन्हाळी सुट्टीतील परदेशवाऱयांचे बुकिंग यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी घटले आहे.
इराण युद्धामुळे एकीकडे महागाई आणि इंधन टंचाईचा भडका उडाला असताना विमान वाहतूक आणि त्यासोबतच पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे दर अवाच्या सवा वाढवले आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत परदेशवारीचे नियोजन करणाऱया कुटुंबांची कोंडी झाली आहे. युद्धाचे सावट आणि वाढलेले तिकीट दर अशा दुहेरी कात्रीत पर्यटनाची परदेशवारी अडकली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतील परदेशवारीच्या बुकिंगमध्ये 15 ते 20 टक्क्यांची घट झाल्याचे ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्राr यांनी सांगितले. देशांतर्गत पर्यटनावर युद्धाचा कोणताही परिणाम झालेला नाही, असे इन्फिनिटी लेझर टुरिझमचे सचिन देशमुख यांनी सागितले. युद्ध लांबल्यास उन्हाळी सुट्टीतील परदेशवाऱया तिकीटवाढीमुळे कमी होतील, असा अंदाज त्यांनी बांधला.
वेट अँड वॉच
पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे आहेत. हे युद्ध थांबेल अशी आशा सगळ्यांनाच आहे. सगळेच वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. यंदा मात्र, विशेषतः युरोप तसेच आखाती देशांतील टूरला सध्यातरी प्रतिसाद कमी आहे. त्यातही ऑनलाइनऐवजी टूर एजंटमार्फत टूरप्लान करण्यावर भर आहे, असे राजा राणी ट्रव्हल्सचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
ट्रव्हल कंपन्यांच्या माध्यमातून अनेकजण परदेशवारीचे नियोजन करतात. आखाती देशात थांबून मग पुढचा प्रवास असे अनेकांचे पॅकेज असते. मुंबईतून लंडनला जाण्यासाठी साधारण 50 हजारांपर्यंत तिकीट मिळते. मात्र त्याच तिकिटाचे एप्रिलमधील दर आता 85 हजारांच्या घरात गेले आहेत. एअर इंडियाच्या मुंबई-लंडन थेट विमानाचे दर 1 लाख 30 हजारपेक्षा जास्त आहेत.
आखाती देशांतील तणावामुळे प्रामुख्याने दुबई, दोहा आणि अबुधाबी मार्गे युरोपमध्ये जाणाऱ्या विमानांना मोठा फटका बसला आहे. पुढच्या महिन्यातील स्थितीवर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत.
आता विदेशवारीचे नियोजन करणाऱयांनी आखाती देशांतील ट्रीपला कात्री लावली आहे. श्रीलंका, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, अझरबैजान, बाली, फिलीपाईन्स, तुर्कीकडे त्यांचा ओढा आहे.


























































