
इराणची सर्वात मोठी तेल रिफायनरी अबादानला रविवारी मोठी आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाले आहेत. या आगीमुळे रिफायनरीच्या कामात कुठलाही अडथळा आलेला नाही. हा अपघात होता की घातपात याबद्दल काही कळू शकलेले नाही.
रिफायनरीच्या केवळ एका युनिटमध्ये ही आग लागली होती. त्यामुळे जास्त नुकसान झालेले नाही, अशी माहिती इराणच्या संसदेचे उपसभापती अली निकजाद यांनी दिली. अबादान ही इराणची सर्वात जुनी आणि मोठी रिफायनरी आहे. इराणची राजधानी तेहरानपासून 670 किलोमीटरवर असलेली ही रिफायनरी 1912 साली सुरू झाली होती. या रिफायनरीत दिवसाला 52 लाख बॅरल तेलाचे शुद्धीकरण केले जाते. हा आकडा इराणच्या एकूण तेल उत्पादनाच्या 25 टक्के इतका आहे.