Israel Iran War – इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय; तेल व्यापारासाठी घातली मोठी अट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनी सध्या अतिशय संवेदनशील बनला आहे. इराणने या मार्गावर लष्करी नाकेबंदी केल्यामुळे हजारो तेलवाहू टँकर्स आणि मालवाहू जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत. त्यातच आता ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून तेल टँकरच्या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इराण एका नवीन धोरणाचा विचार करत आहे. इराण या मार्गावरून मर्यादित तेल टॅंकरला परवानगी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यासाठी कच्च्या तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरऐवजी चिनी ‘युआन’मध्ये करणे अनिवार्य आहे. यासंदर्भातील माहिती सीएनएन (CNN) च्या वृत्तात देण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर तेलाचे व्यवहार सहसा डॉलरमध्ये केले जातात, मात्र इराणच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मार्गीका मानली जाते. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी 20 टक्के वाहतूक याच मार्गातून होते. या जलमार्गावरील संभाव्य निर्बंधांच्या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी जुलै 2022 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. संयुक्त राष्ट्रानेही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. या मार्गावरील वाहतूक थांबल्यास अन्न, औषधे आणि खतांचा पुरवठा खंडित होऊन त्यांचे दर गगनाला भिडू शकतात, असा इशारा मानवी हक्क प्रमुख टॉम फ्लेचर यांनी दिला आहे.

चीन आणि इराणचे संबंध मैत्रीपूर्ण असून चीन आपल्या ऊर्जेसाठी आखाती देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला मिळणाऱ्या एकूण तेलापैकी 45 टक्के तेल याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते. त्यामुळे इराणने घेतलेला हा निर्णय चीनच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रशियावर लादलेल्या निर्बंधांनंतर ज्याप्रमाणे रशियन तेलाचा व्यापार रुबल किंवा युआनमध्ये झाला, तसाच प्रकार आता इराणच्या बाबतीत घडताना दिसत आहे.

दुसरीकडे, मध्य पूर्वेतील हा तणाव लष्करी संघर्षाकडे वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मुख्य तेल केंद्र असलेल्या ‘खार्ग बेटा’जवळील लष्करी तळांवर हल्ले केल्याचे सांगितले आहे. तसेच अमेरिकन नौदल लवकरच तेल टँकरला सुरक्षा प्रदान करण्यासाठी या सामुद्रधुनीत तैनात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खार्ग बेट हे इराणच्या मुख्य भूमीपासून 30 किमी अंतरावर असून इराणच्या कच्च्या तेलाच्या एकूण निर्यातीपैकी 90 टक्के व्यवहार याच बेटावरून होतात, ज्यामुळे हे बेट या युद्धाचे मुख्य केंद्र बनले आहे.

 

 

होर्मुझच्या सामुद्रधुनीत हजारों जहाजे अडकली; इंधन कोंडीमुळे जागतिक महायुद्धाचा धोका वाढला