Israel Iran War – आता तुम्ही स्वतःशीच वाटाघाटी करत आहात; इराणकडून ट्रम्प यांची खिल्ली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धविरामाचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, इराणी सैन्याने ट्रम्प यांची खिल्ली उडवत म्हटले आहे की, तुमच्यासारख्या माणसाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. बुधवारी युद्धाचा २६ वा दिवस असून ट्रम्प यांनी आता आखातात आपले सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाची इराणी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी यांनी ट्रम्प यांची खिल्ली उडवली.

युद्ध संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांदरम्यान इराणच्या लष्कराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा अपमान करत त्यांची खिल्ली उडवली आहे. इराणी लष्कराच्या खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी म्हणाले, आम्ही तुमच्यासारख्या व्यक्तीशी कधीही तडजोड करणार नाही. आता नाही अन् कधीच नाही. आता वाटाघाटी होणार नाहीत. लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी यांचे हे विधान इराणी सरकारी दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आले.

लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झुल्फिकारी ट्रम्प यांची खिल्ली उडवत म्हटले, तुमचे अंतर्गत संघर्ष इतक्या टोकाला पोहोचले आहेत का की तुम्ही स्वतःशीच वाटाघाटी करत आहात? आमचे पहिले आणि शेवटचे शब्द पहिल्या दिवसापासून एकच आहेत आणि ते तसेच राहतील. आम्ही तुमच्यासारख्या व्यक्तीशी कधीही तडजोड करणार नाही. ज्या सामरिक शक्तीबद्दल तुम्ही बोलत होता, तिचे आता सामरिक अपयशात रूपांतर झाले आहे. जे स्वतःला जागतिक महासत्ता म्हणवतात, त्यांचे जर चालले असते, तर ते आतापर्यंत या गोंधळातून बाहेर पडले असते. तुमच्या पराभवाला तडजोड म्हणू नका. तुमच्या पोकळ आश्वासनांचे युग संपले आहे, असेही त्यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे.

अमेरिकेने घोषणा केली आहे की ते येत्या काही दिवसांत ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनमधून किमान १,००० सैनिक मध्य-पूर्वेत पाठवणार आहे. पेंटागॉन देखील दोन मरीन युनिट्स तैनात करण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यामुळे या प्रदेशातील मरीन आणि हजारो खलाशांची एकूण संख्या अंदाजे ५,००० होईल. या सर्व घडामोडींमुळे ट्रम्प यांचा सातत्याने युद्धसमाप्तीबाबतचा दावा आणि इराणचा सातत्याने इन्कार, यामुळे आगामी परिस्थितीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.