Iran Israel USA War या ३ अटींवर इराण युद्ध थांबवण्यासाठी तयार; अमेरिकेला दिला निर्वाणीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले Iran Israel USA War थांबवण्यासाठी इराणकडून जगासमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत.

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने हे युद्ध संपवण्यासाठी तीन प्रमुख अटी मांडल्या आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले की, शांततेसाठी इराणच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता मिळणे आणि भविष्यात कोणत्याही हल्ल्याची शक्यता नसण्याची हमी मिळणे आवश्यक आहे.

राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या अटी जाहीर केल्या आहेत. रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या अटी स्पष्ट केल्या.

इराणच्या ३ प्रमुख अटी:

१. कायदेशीर अधिकारांची मान्यता: इराणच्या सार्वभौम आणि कायदेशीर अधिकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी.

२. युद्धभरपाई: या युद्धात इराणचे जे काही नुकसान झाले आहे, त्याबद्दल योग्य नुकसानभरपाई (Reparations) दिली जावी.

३. भविष्यातील सुरक्षेची हमी: भविष्यात इराणवर पुन्हा कधीही लष्करी आक्रमण होणार नाही, याची ठाम आंतरराष्ट्रीय हमी दिली जावी.

‘झिओनिस्ट राजवट आणि अमेरिकेने पेटवलेले हे युद्ध संपवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,’ असे पेझेश्कियान यांनी नमूद केले.

बंदरांना लक्ष्य केल्यास चोख प्रत्युत्तर

इराणच्या सशस्त्र दलांचे प्रवक्ते अबोलफझल शेकरची यांनी कडक इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने इराणच्या बंदर किंवा गोदींना (Docks) लक्ष्य केले, तर पर्शियन गल्फमधील कोणताही देश किंवा आर्थिक केंद्र इराणच्या आवाक्याबाहेर असणार नाही. ‘आमची बंदरे धोक्यात आली, तर या क्षेत्रातील सर्व बंदरे आमची कायदेशीर लक्ष्ये असतील. आम्ही आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांपेक्षाही भीषण हल्ला करू,’ असे त्यांनी सरकारी टीव्हीला सांगितले. तसेच, आखाती देशांनी अमेरिकन लष्कराला आपल्या भूमीवरून हाकलून लावावे, असे आवाहनही त्यांनी केले.

इस्रायलचा युद्धाबाबत अंदाज

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंद दाराआड चर्चा करताना कबूल केले आहे की, केवळ बॉम्बस्फोटांमुळे इराणमधील धार्मिक सरकार कोसळेल याची खात्री देता येत नाही. सध्या इराणमध्ये लोकशाहीसाठी कोणतेही मोठे जनआंदोलन उभे राहताना दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपण्याचे संकेत दिले असले, तरी इस्रायलच्या मते वॉशिंग्टन सध्या तरी युद्ध थांबवण्याच्या मानसिकतेत नाही.

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक लष्करी कमांडर मारले गेले आहेत. मात्र, या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाल्यामुळे आणि सार्वजनिक इमारती उद्ध्वस्त झाल्यामुळे इराणी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. सध्या कडक निर्बंधांमुळे लोक रस्त्यावर येण्यास घाबरत असले, तरी ढासळती अर्थव्यवस्था आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळे इराणसमोरील आव्हाने अधिक कठीण झाली आहेत.

अमेरिका आणि इस्रायल या मागण्यांवर विचार करून काय उत्तर देणार याकडे आता जगाचे लक्षं लागले आहे. इराण समोर समस्यांचा डोंगर उभा आहे. पण अमेरिकेतही महागाई, बेकारीचे संकट आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव जगावर पडतो त्यामुळे जागतिक अर्थ संकट निर्माण झाले आहे.