
इराणमध्ये सरकारविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान 500 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 5 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, इराण सरकारने या नागरिकांना दहशतवाद्यांनी मारल्याचा दावा करुन हात झटकले आहेत.
महागाई प्रचंड वाढल्यामुळे इराणमध्ये ‘जेन-झी’ रस्त्यावर उतरली असून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. 28 डिसेंबरपासून सुरू झालेल्या निदर्शनांचे लोण संपूर्ण देशभरात पसरले. इराणच्या एका अधिकाऱयाने यासंदर्भात माहिती दिली. त्याने सांगितले की, निष्पाप नागरिकांना दहशतवादी आणि सशस्त्र दंगलखोर लक्ष्य करत आहेत. मृतांच्या आकडेवारीची पडताळणी केली असून अंतिम आकडा फार मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, असे या अधिकाऱयाने सांगितले.
अमेरिकेतील मानवाधिकार संस्थेने 3,308 मृत्यूंची नोंद केली आहे. आणखी 4.382 प्रकरणांचा आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यत 24 हजार नागरिकांना अटक केल्याची माहिती या संस्थेने दिली.
ट्रम्प यांनी धोका दिला, इराणी नागरिकांचा आरोप
इराणमध्ये निदर्शने करणाऱया नागरिकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर धोका दिल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प हे मदत करतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती.मात्र, आता त्यांची भूमिका बदललेली दिसते. इराणी अधिकाऱयाने ट्रम्प यांना आणखी हत्या करणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे आम्हाला कळले. हे ऐकून आम्ही हैराण झालो आहोत, असे एका नागरिकाने म्हटले.



























































