
युद्धबंदीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेला 15 कलमी प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे. ‘हा प्रस्ताव मर्यादा भंग करणारा असल्याचे सांगताना इराणनेच अमेरिकेला काही अटी घातल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीवर अंतिम अधिकार आमचाच राहील हे मान्य करा, अशी यातील प्रमुख अट आहे.
अमेरिकेने पाकिस्तान व तुकाaच्या माध्यमातून इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र तो इराणने अमान्य केला आहे. याउलट इराणने अमेरिकेलाच पाच नव्या मागण्यांची यादी पाठवली आहे. युद्ध कधी थांबवायचे आणि कोणत्या अटींवर थांबवायचे हे ट्रम्प ठरवणार नाहीत. त्याची वेळ आणि अटी आम्ही ठरवू, असेही इराणने ठणकावले आहे.
अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करतेय!
‘आमच्या विरुद्धचे युद्ध अमेरिका हरली आहे. नाचक्की टाळण्यासाठी आता ट्रम्प स्वतःशीच वाटाघाटी करत आहेत. अंतर्गत मतभेदांमुळे ते पुरते गोंधळून गेले आहेत,’ अशी टीका इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवत्ते इब्राहिम झोल्फघारी यांनी केली. ’आमचे तुमच्याशी कधीच पटणार नाही. आमच्यापैकी कुणीही तुमच्याशी कोणताही करार करणार नाही. आता नाही आणि कधीच नाही. ज्या लष्करी शक्तीचा तुम्ही टेंभा मिरवता, ती कुचकामी ठरली आहे. आता पराभवाला कराराचा साज चढवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या पोकळ बातांचा जमाना संपला आहे,’ असे झोल्फघारी यांनी अमेरिकेला ठणकावले.
या आहेत इराणच्या अटी?
- इराणवरील हल्ले पूर्ण बंद करा.
- इराणवर पुन्हा युद्ध लादले जाणार नाही याची हमी द्या.
- आर्थिक नुकसानीची भरपाई द्या. त्याचे स्वरूप स्पष्ट करा.
- युद्ध सर्व आघाडय़ांवर थांबवा.
- होर्मुझवर इराणची सार्वभौम सत्ता चालेल. तो इराणचा नैसर्गिक आणि कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करा.
‘लिंकन’ने पळ काढला… अमेरिकेच्या युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौकांपैकी एक असलेल्या अब्राहम लिंकनवर इराणी हवाई दलाने आज जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर लिंकनने इराणच्या समुद्रातून माघार घेत सुरक्षित अंतरावर पळ काढला. हल्ल्यात लिंकनचे नुकसान झाल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिकेने मात्र तो फेटाळून लावला आहे.
अमेरिका-इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जगाची कोंडी केली आहे. त्यामुळे अमेरिकाही बॅकफूटवर गेली आहे. हा मार्ग खुला करण्यासाठी अमेरिका जंगजंग पछाडत असून त्यासाठी अमेरिकेने अब्राहम लिंकनला होर्मुझच्या दिशेने धाडले होते. मात्र, इराणी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने लिंकनवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे हे युद्धनौका परत फिरली.
टप्प्यात आली की पुन्हा लक्ष्य करणार
‘अब्राहम लिंकनवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमच्या रडारवर आल्यास आणि क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आल्यास आम्ही पुन्हा हल्ला करणार,’ असा इशारा आयआरजीसीने दिला आहे.




























































