
इराण इस्रायल – अमरेका संघर्षात अमेरिकेच्या एका पायलटची सुखरुप सुटका करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा दावा केला असला, तरी माघारीदरम्यान अमेरिकन दलाला स्वतःची दोन विमाने उडवावी लागल्याचे वृत्त आहे.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला माहिती देणाऱ्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, या कारवाईत MC-130J प्रकारची दोन वाहतूक विमाने वापरण्यात आली होती. ही विमाने शत्रूच्या प्रदेशात गुप्तरीत्या घुसखोरी आणि सुटका मोहिमांसाठी वापरली जातात. मोहिमेदरम्यान ही विमाने अडकली होती आणि ती शत्रूच्या हाती लागू नयेत म्हणून त्यांना नष्ट करण्यात आले.
दरम्यान, इराणच्या संसदाध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी अमेरिकेची खिल्ली उडवत जळालेल्या विमानांचे छायाचित्र सामाजिक माध्यमावर शेअर केले. “अशा तीन ‘विजयां’नंतर अमेरिका पूर्णपणे उद्ध्वस्त होईल,” असा टोला त्यांनी लगावला.
इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ही विमानं पाडल्याचा दावा केलेल्या F-15E लढाऊ विमानाशी संबंधित आहे. या विमानातील दोन सदस्यांपैकी एकाची सुटका यापूर्वीच करण्यात आली होती, तर दुसऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी मोठी मोहीम सुरू केली होती, असे ‘रॉयटर्स’ने म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, अडकलेल्या अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी अमेरिकन लष्कराने “अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज डझनभर विमाने” पाठवली होती. “इराणच्या डोंगराळ भागात ही सुटका करण्यात आली असून लष्करी इतिहासात प्रथमच दोन अमेरिकन वैमानिकांना शत्रूच्या प्रदेशात वेगवेगळ्या मोहिमांतून वाचवण्यात आले आहे,” असा दावा त्यांनी केला.
If the United States gets three more victories like this, it will be utterly ruined. 👏 pic.twitter.com/jutDghVrjz
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 5, 2026
सुटका करण्यात आलेला अधिकारी हा पाडलेल्या विमानातील वेपन सिस्टम्स अधिकारी असून त्याला दुखापत झाली असली तरी तो लवकरच पूर्णपणे बरा होईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले. पहिल्या वैमानिकाच्या सुटकेची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव आधी जाहीर करण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने या कारवाईदरम्यान अमेरिकेची अनेक विमाने पाडल्याचा दावा केला आहे. इराणी माध्यमांनुसार, संयुक्त कारवाईत शत्रूची विमाने नष्ट करण्यात आली. तसेच इस्फहानच्या दक्षिण भागात अमेरिकेचे C-130 वाहतूक विमान पाडल्याचेही इराणच्या पोलीस दलाने म्हटले आहे. इराणच्या सशस्त्र दलाच्या संयुक्त मुख्यालयाचे प्रवक्ते म्हणाले की, या संघर्षात एक C-130 वाहतूक विमान आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर नष्ट झाले आहेत.
दरम्यान, ‘सीएनएन’च्या आकडेवारीनुसार या युद्धात आतापर्यंत किमान सात अमेरिकन विमाने नष्ट झाली आहेत. यामध्ये दोन वैमानिकांसह F-15 आणि A-10 विमानांचा समावेश आहे. जर इराणचे ताजे दावे खरे ठरले, तर हा आकडा दहाच्या पुढे जाऊ शकतो, जे अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाच्या दाव्याला मोठा धक्का मानला जात आहे.

























































