Iran US Israel War – होर्मुझजवळ महायुद्ध पेटलं; ‘एफ-15’नंतर इराणने अमेरिकेचे ‘ए-10 थंडरबोल्ट’ लढाऊ विमान पाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण, अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका इराणवर दबाव वाढवत आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या या धमक्यांना इराण धमाक्यांनी उत्तर देत असून आखातातील अमेरिकन तळ आणि इस्रायलच्या प्रमुख शहरांवर तुफान हल्ले चढवत आहे. अशातच इराणने एकाच दिवशी अमेरिकेची दोन लढाऊ विमानं पाडली आहेत, त्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

शुक्रवारी इराणने अमेरिकन वायुसेनेचे ‘ए-10 थंडरबोल्ट’ हे लढाऊ विमान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पाडले आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये इराणने अमेरिकेचे दुसरे लढाऊ विमान पाडले आहे. याआधी इराणने ‘एफ-15 ई स्ट्राईक ईगल’ हे शक्तीशाली विमान पाडले होते. त्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ‘ए-10 थंडरबोल्ट’ लढाऊ विमानाला लक्ष्य केले.

इराणच्या सरकारी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले असून ‘न्यूयॉर्क टाइम्स’नेही या वृत्तास दुजोरा दिला आहे. ‘ए-10 थंडरबोल्ट’ विमानाचा पायलट सुरक्षित असून त्याला वाचवण्यात यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘न्यूज 18‘ने याबाबत वृत्त दिले आहे. इराणने अमेरिकेचे हे विमान कसे पाडले याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र यास अमेरिकन अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, इराणच्या डिफेन्स सिस्टीमने अमेरिकेचे ‘एफ-15 ई स्ट्राईक ईगल’ हे लढाऊ विमान पाडले. यातील दोन क्रू मेंबर्सपैकी एकाची सुटका करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध अद्याप सुरू आहे. विमान कोसळल्यानंतर तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये अमेरिकेचे ‘HC-130’ रिफ्युलर विमान आणि ‘HH-60G’ पेव्ह हॉक्स हेलिकॉप्टर इराणच्या आकाशात घिरट्या घालताना दिसत आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनीही राष्ट्राध्यक्षांना या घटनेची पूर्ण माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेवर मोठी नामुष्की, इराणने एफ-35 विमान पाडले;पॉवरप्लॅण्ट उडवण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर

इराणसोबतच्या युद्धात ए-10 विमानांचा वापर वाढला आहे. ही विमाने विशेषतः हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या वेगवान युद्धनौकांना लक्ष्य करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या एका ए-10 थंडरबोल्ट विमानाची किंमत 18.8 दशलक्ष यूएस डॉलर आहे. 1970-80 च्या दशकामध्ये या विमानांची निर्मिती करण्यात आली असून तेव्हा याची किंमत 9.8 दशलक्ष डॉलर एवढी होती. दोन इंजिन असणारे हे विमान असून याचा उड्डाण आणि देखभाल खर्चही किमी आहे. ही विमानं गेल्या 40 वर्षांपासून अमेरिकेच्या वायुसेनेच्या सेवेत आहे.