
इराण-अमेरिका युद्धामुळे हिंदुस्थानात महागाईचे मिसाईल कोसळले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत थेट 218 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर विमानाच्या इंधनाचे दर थेट दुपटीने वाढले असून ते किलोलिटरमागे दोन लाखांच्याही वर गेले आहेत. या सगळय़ाचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. हॉटेलमध्ये खाण्याचेही वांधे होणार असून विमान प्रवासही महागणार आहे.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे इंधनाची वाहतूकच थांबली आहे. हिंदुस्थानला याचा मोठा फटका बसला आहे. देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दर वाढवून गॅसच्या मुक्त वापरावर निर्बंध आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- व्यावसायिक सिलिंडर महाग झाल्याने हॉटेलमधील पदार्थही महागणार आहेत. घरगुती सिलिंडर मिळण्याची मारामार असताना आता हॉटेलमधील जेवणही महागणार असल्याने सर्वसामान्यांची कोंडी झाली आहे.
जेट इंधनाच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. हे इंधन किलोलिटरमागे 2.07 लाखांवर पोहोचले आहे. यापूर्वी रशिया-युव्रेन युद्धानंतर विमानाचे इंधन महागले होते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने आज नवे दर जाहीर केले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर
- मुंबई 2031 (वाढ 196 रु.)
- दिल्ली 2078.50 (वाढ 195.50 रु.)
- चेन्नई 2246.50 (वाढ 203 रु.)
- कोलकाता 2208 (वाढ 218 रु.)
एलपीजीने भरलेले ‘जग वसंत’ जहाज मुंबईत
- ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीचे ‘जग वसंत’ हे जहाज युद्धाचा केंद्रबिंदू असलेली होर्मुझजी सामुद्रधुनी पार करून बुधवारी मुंबईच्या किनाऱयाला लागले.
- जहाजावर 47 हजार मेट्रिक टन एलपीजी आहे.
- कुवेतमधील मीन अल अहमदी बंदरावर जहाजात एलपीजी भरण्यात आला.
- हा गॅस घेऊन जहाज प्रथम गुजरातमधील वाडीनर बंदरात पोहोचले. तिथे काही टन एलपीजी उतरवण्यात आला. मात्र तेथील साठवण क्षमता संपल्याने जहाज मुंबईला वळवण्यात आले.
कांद्याची माती झाली, भाव निम्म्यापेक्षा घसरला
एकीकडे तेल आणि गॅस महाग होत असताना दुसरीकडे निर्यात मंदावल्याने शेतकऱयांचे हाल होत आहेत. कांद्याच्या पिकाची अक्षरशः माती झाली आहे. कांद्याचे दर क्विंटलमागे 50 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. हे दर 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटलवरून 300 ते 800 रुपयांवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने बाजार हस्तक्षेप योजना (MIS) तातडीने लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे. कांदा साठवून ठेवण्यास मर्यादा असल्याने कमी भावात नाइलाजाने शेतकऱयांना विक्री करावी लागत आहे. एमआयएस लागू करण्यासारखी ही परिस्थिती आहे, असे संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सांगितले. सरकारने तत्काळ उपाययोजना न केल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.






















































