
इराण युद्धामुळे जगात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, युद्धामुळे त्यापेक्षाही मोठे संकट जगावर येण्याची भीती आहे. हे संकट आहे अन्न तुटवडय़ाचे. आखाती देशांमधून होणारा खत पुरवठा खंडित झाल्यामुळे जागतिक बाजारात खतांच्या किमती गगनाला भिडल्या असून, याचा सर्वाधिक फटका कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
सौदी अरब, कतर, ओमान, युएई हे जगाला युरिया पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. युरिया, सल्फर आणि अमोनिया यांचा सर्वाधिक पुरवठा या देशांमधुन होतो. तर, इराण हा अमोनियाचा जगातील तिसरा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी या घटकांची आवश्यकता असते. मात्र, हे सर्वच देश युद्धात अडकले आहेत. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा खतांचा पुरवठा ठप्प झाला आहे. सुमारे 40 टक्के खतांची वाहतूक या मार्गातून होते. कच्च्या तेलाची वाहतूक रोखण्यापेक्षाही खत पुरवठा ठप्प पडणे, हे जगासाठी जास्त धोकादायक आहे. पेंद्र सरकारने मात्र आगामी खरीप हंगामासाठी देशात खतांचा मुबलक साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या स्थितीत देशात 177.31 लाख टन एवढा खतांचा साठा असल्याचे सरकारने सांगितले आहे.
दीर्घकालीन धोका जास्त
खत पुरवठय़ावर परिणाम झाल्यास दीर्घकालीन धोका जास्त आहे. खतांसाठी इतर कोणतेही मोठे पुरवठादार नाहीत. रशिया हा एकमेव मोठा पुरवठादार आहे. मात्र, आखाती देशांमधून होणाऱया पुरवठय़ाची रशिया बरोबरी करू शकत नाही. चीनमध्ये निर्यातीवर निर्बंध आहेत. त्यामुळे चीनकडूनही खतांची तूट भरुन काढणे कठीण होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे.
हिंदुस्थान खतांच्या आयातीवर अवलंबून
हिंदुस्थान खतांसाठी आयातीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. म्युरेट ऑफ पोटॅश हे 100 टक्के आयात होते. डीएपी 60 टक्क्यांपर्यंत आयात होते. हिंदुस्थानात दरमहा सुमारे 20 लाख टन एवढी खतांची आयात होते. गेल्या आर्थिक वर्षात पेंद्र सरकारने खत अनुदानावर 1.9 लाख कोटी रुपये खर्च केले होते.
शेतकऱयांकडून आतापासूनच जुळवाजुळव
खत पुरवठय़ावर होणारा परिणाम विचारात घेऊन अनेक देशांमधील शेतकऱयांनी आतापासूनच खतांचा साठा करुन ठेवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर हिंदुस्थानात खतांचा तुटवडा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


























































