इराणची धमकी! एक थेंबही तेल जाऊ देणार नाही!! कटिंग चायचेही वांदे झाले; हिंदुस्थान गॅसवर… मुंबईसह महाराष्ट्रात सिलिंडरसाठी रांगा, हॉटेल बंद, घरच्या शेगड्याही थंडावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धाचा भयंकर फटका जगाला बसला आहे. मध्य पूर्वेच्या भूमीवरून एक थेंबही तेल बाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकीच इराणने दिली आहे. त्यामुळे देशादेशांत पेट्रोल-डिझेल व गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. आखातातून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणाऱया हिंदुस्थानची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. हिंदुस्थान अक्षरशः ‘गॅस’वर असून कटिंग चाय मिळण्याचेही वांदे झाले आहेत. तुटवड्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात सिलिंडरसाठी रांगा लागल्या आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट एकामागोमाग एक बंद होत आहेत. घरच्या शेगडय़ाही थंडावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांनी चुली आणि इलेक्ट्रिक उपकरणांकडे मोर्चा वळवला आहे.

इराण-अमेरिका द्धु अकराव्या दिवशीही सुरूच आहे. युद्ध संपल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत इराणने आज पुन्हा यूएई, कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियावर हल्ले चढवले. पुढील सूचनेपर्यंत तेलाचा एक थेंबही आखातातून बाहेर जाऊ न देण्याचा निर्धार इराणने केला आहे. त्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, इराणने अरब आणि युरोपीय राष्ट्रांना ऑफर दिली आहे. आपापल्या देशातील अमेरिकी दूतावासांना हाकलून लावा. तसे केल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तुमच्या तेलवाहू जहाजांना सोडले जाईल, असे इराणने म्हटले आहे. इराणच्या या ऑफरमुळे अमेरिकेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळय़ाबाजारात सिलिंडरचे दर पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यातील हॉटेलांत चुलीवर स्वयंपाक

गॅस पुरवठ्याअभावी हॉटेल सुरू ठेवणे कठीण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाकासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात तर स्थिती अधिकच बिकट झाली असून शहरातील अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण दिले जात आहे, तर इलेक्ट्रिक शेगडय़ांचा वापरही वाढला आहे. मात्र चूल आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या वापराला मर्यादा असल्याने हॉटेलच्या मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ गायब झाले आहेत.