अमेरिकी तळांना वीज पुरवल्यास खैर नाही; इराणच्या इशाऱ्याने आखाती देशांमध्ये धास्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 24 तासांत मध्य आखाती देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत मंगळवारी मध्यरात्री संपणार आहे. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’वरील आपला ताबा सोडावा, अन्यथा त्यांच्या वीज प्रकल्पांवर हवाई हल्ले केले जातील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. या धमकीमुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्धाचे ढग पसरले असून आता केवळ क्षेपणास्त्रेच नाही तर ऊर्जा स्रोत हे युद्धाचे मुख्य केंद्र बनले आहेत.

अमेरिकेच्या या इशाऱ्याला इराणने अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. जर आमच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य केले, तर आम्ही संपूर्ण प्रदेशातील अशा सर्व पॉवर प्लांट्सना उद्ध्वस्त करू, जे अमेरिकन लष्करी तळांना वीज पुरवतात, त्यांची खैर नाही, असा स्पष्ट इशारा इराणने दिला आहे. इराणच्या या भूमिकेमुळे अमेरिकन हितसंबंध असलेल्या औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. इराणने म्हटले आहे की, आतापर्यंत आम्ही संयम पाळला, पण ऊर्जेवर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल.

या संभाव्य ‘वीज युद्धाचा’ सर्वाधिक फटका आखाती देशांतील सामान्यांना बसण्याची भीती आहे. या प्रदेशातील अनेक देशांमध्ये वीज प्रकल्पांशीच ‘डिसॅलिनेशन प्लॅन्ट्स’ (समुद्राचे पाणी गोड करणारे प्रकल्प) जोडलेले असतात. त्यामुळे वीज केंद्रांवर हल्ला झाल्यास केवळ अंधारच नाही, तर पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट उभे राहणार आहे

जागतिक स्तरावर या तणावाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेची डेडलाइन संपण्यासाठी आता अवघे काही तास उरले असून, संपूर्ण जग या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे.