
अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झालेले इराणचे अणुप्रकल्प पुढील 15 दिवसांत पुन्हा सुरू होतील, असा दावा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी आज केला. देशातील अणुऊर्जा प्रकल्प स्थळांचा दौरा केल्यानंतर व तेथील वैज्ञानिकांशी चर्चा केल्यानंतर पेजेश्कियन यांनी ही माहिती दिली. त्यामुळे इराणला आण्विक कार्यक्रमापासून रोखण्याच्या अमेरिकेच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.
दोन महिन्यांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटले होते. अमेरिकेनेही त्यात उडी घेत इराणमधील अणुप्रकल्पांना लक्ष्य केले होते. इराणने तोडीस तोड उत्तर देत मध्य पूर्वेतील अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यानंतर हे युद्ध थांबले. इराणमधील अणुप्रकल्प नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावेळी केला होता, मात्र इराणने नव्या जोमाने पुन्हा हे प्रकल्प उभारले आहेत. येत्या काही दिवसांत तिथे पुन्हा आण्विक कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. ‘इमारती आणि कारखाने उद्ध्वस्त करून कोणी आम्हाला थांबवू शकत नाही. आम्ही ते पुन्हा बनवणार आणि आधीपेक्षा मजबूत असतील, असे पेजेश्कियन यांनी स्पष्ट केले.




























































