चाकून भोसकले, सिग्नलला उलटे टांगून गळा चिरला; तरूणाच्या जमावाकडून झालेल्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल

1484

इराकमध्ये सरकारविरोधात उग्र आंदोलन सुरू आहे. गेले अनेक महिने हे आंदोलन सुरू असून गुरुवारी या आंदोलनाने भयानक रुप धारण केले. आंदोलकांनी एका 16 वर्षांच्या तरुणाला भीषण पद्धतीने ठार मारले. धक्कादायक बाब ही आहे की हे घडत असताना पोलीस हे सगळं शांतपणे बघत होते. या तरुणाला 17 वेळा भोसकण्यात आलं, पायाला दोर बांधून त्याला रस्त्यावरील सिग्नलवर उलटं टांगण्यात आलं. आणि त्याचा गळा चिरून ठार मारलं.

आंदोलकांचा हा नंगा नाच सुरू असताना गणवेशात असलेले पोलीस काहीही करत नव्हते. यामुळे आंदोलकांना अजूनच चेव चढला होता. बगदादमध्ये सुरक्षारक्षकांनी 400 आंदोलकांना ठार मारले होते. गुरुवारी आंदोलन करणाऱ्या गटावर त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाने हल्ला केला. या दोन गोष्टींचा राग आल्याने गुरुवारचे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात तरुणाला भीषण पद्धतीने ठार मारले जात असताना पोलिसांनी शांतपणे घटना बघत राहणे आणि बघ्यांनी तरुणाचा बचाव करण्याऐवजी मोबाईलने घटनेचे चित्रीकरण करणे यामुळे इराकमध्ये माणूसकी शिल्लक राहिली नसल्याचं प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे.

हे आंदोलन ठार मारण्यात आलेल्या तरुणाच्या घराबाहेर जमले होते. जोरजोराने घोषणाबाजी करणाऱ्या आणि 3 दिवस रस्ता अडवणाऱ्यांना पांगवण्यासाठी या तरुणाने हवेत गोळीबार केला होता. यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी त्याला घरातून खेचून बाहेर काढला आणि भर चौकात लटकावून त्याचा खून केला. मानवाधिकाराच्या इराकमधील उच्चायुक्त कार्यालयाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. शेकडो बघे ही घटना घडत असताना मुर्दाडासारखी ती पाहात होते. त्याचं व्हिडीओ चित्रीकरण करत होते. यावरून इथल्या समाजाचं हिंसेला प्रोत्साहन असल्याचंच दिसून येत असल्याचं मत उच्चायुक्तालयाचे सदस्य अली अल-बायाती यांनी म्हटले आहे. ज्या तरुणाला ठार मारण्यात आलं त्याचं नाव हैताम अली इस्माईल असल्याचं सांगण्यात आलं आहे.

खरंतर हे आंदोलन इराकमधला वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि इराणच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भडकलेलं आहे. मात्र हे आंदोलन आता भरकटलं असून हिंसाचाराचा आंदोलनामध्ये कळस झाला आहे. या आंदोलनामुळे इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल माहदी यांना गेल्या महिन्यात राजीनामा द्यावा लागला आहे. देश चालवणारी कोणीही व्यक्ती नसल्याने आंदोलनकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर कोणीही पुढाकार घेऊ शकत नाही.

हैतामने हवेत गोळीबार केला तेव्हा आंदोलकांना वाटलं की त्याने कोणाला तरी ठार मारले आहे. गोळीबारानंतर आंदोलक, बेरोजगार युवक आणि लहान मुले त्याच्या घरात शिरली. हैतामची आईदेखील घरात होती. तिच्या डोळ्यासमोर हैतामला 17 वेळा चाकून भोसकण्यात आले. त्याला शर्टाला धरून फरफटत रस्त्यावर आणण्यात आले. तहरीर चौकात त्याला सिग्नलच्या खांबावर लटकावण्यात आले आणि त्याचा गळा चिरण्यात आला. हैतामचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पोलिसांच्या गाडीमध्ये फेकून देण्यात आले. हे प्रकरण आपल्यावर शेकणार हे लक्षात येताच आंदोलकांच्या नेत्यांनी घटनेला आपण जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या