
दहिसर विभागातील प्रभाग क्रमांक 3 च्या मतमोजणी प्रचंड गडबड-गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवार रोशनी गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे या मतमोजणीचे संपूर्ण सीसीटाव्ही फुटेज जाहीर करा, अशी मागणी रोशनी गायकवाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, पालिकेचे उपआयुक्त प्रशांत गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना निवेदन दिले आहे.
प्रभाग क्रमांक 3 च्या मतमोजणीत संविधानाची पायमल्ली केल्याचेही गायकवाड यांनी केली आहे. मतमोजणीसाठी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित झाले असता टपाल मतपेटीचे सील आधीच उघडलेले होते. शिवाय ईव्हीएम मशीनचे सीलही आधीच उघडण्यात आले होते. यावर आक्षेप घेतला असता संबंधित अधिकाऱयांनी समाधानकारक उत्तरे न देता आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाय मतदारांना धमकी, दबाव आणि फसवणुकीच्या माध्यमातून मतदारांना चुकीच्या पद्धतीने मतदान करण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे प्रभाग क्र. 3 च्या संपूर्ण मतमोजणीचे सीसीटीव्ही फुटेज मूळ स्वरूपात द्यावेत आणि मतदानात गडबड करणाऱयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


























































