
इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना शासनाने नुकतीच घरे दिली आहेत. त्यामुळे अस्मानी संकटात घर आणि आप्तेष्ट हिरावलेल्या या गावातील 43 कुटुंबांना धीर आला. मात्र त्यांच्या डोळ्यांतील अश्रू सुकत नाहीत तोच चौक ग्रामपंचायतीच्या तुघलकी घरपट्टीची दरड कोसळली आहे. या ग्रामपंचायतीने इर्शाळवाडीवासीयांना तब्बल पाच हजार रुपयांच्या कराची पावती पाठवली असून घरपट्टीचे हे कागद पाहून रहिवाशांचे डोळेच गरगरले आहेत. त्यामुळे आमची झोपडीच बरी होती. दोन वेळ पोटाला मिळताना मारामार असताना आता ही अवाचे सवा घरपट्टी कशी भरायची, असा सवाल दरडग्रस्तांनी केला आहे.
अक्राळविक्राळ दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला होता. तर 43 कुटुंबांतील 228 रहिवाशांपैकी 23 मुलांसह केवळ 144 जण या घटनेत बचावले. आजही या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 57 जणांचे मृतदेह सापडले नसून गाडले गेले आहेत. यातनांचे हे काहूर मनात असताना बचावलेल्या कुटुंबांना शासनाने नवीन घर बांधून दिली असून पाणी, रस्ता तसेच विजेची व्यवस्थादेखील केल्याने रहिवासी आनंदीत होते. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नसून चौक ग्रामपंचायतीने अवाचे सवा घरपट्टी लादल्याने इर्शाळवाडीकर संतप्त झाले आहेत. प्रत्येक कुटुंबाला प्रशासनाने पाच हजारांची घरपट्टी पाठवल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत.
स्लॅबची पक्की घरे नको रे बाबा..
इर्शाळवाडीवासीयांना शासनाने पक्की घरे दिली खरी मात्र ठोस रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात आता 43 कुटुंबांना पाच हजारांची घरपट्टी लावल्याने रहिवासी हादरून गेले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या दरडग्रस्तांनी तुमच्या महालापेक्षा आमची झोपडी बरी असं म्हणत घरांना टाळे लावून पुन्हा जुन्या इर्शाळवाडीत जाण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.
ग्रामसभेत आवाज उठवू
चौक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश मोरे यांनी कर आकारणी नियमानुसार केल्याचे सांगत हात वर केले आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी सांगितले की दंरडग्रस्तांना लावलेली घरपट्टी खूपच जास्त असून याबाबत ग्रामसभेत आवाज उठवला जाईल असा इशारा दिला. नानिवली व इर्शाळवाडी या गावांसह मोरबे धरण बाधित गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.