
एखाद्या गोष्टीची क्रेझ वाढत जाणं म्हणजे काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रोटीन बार खाण्याचा आलेला ट्रेंड. ट्रेंड कुठलाही असो, तुम्ही तो फाॅलो नाही केला तर तुम्ही आऊटडेटेड ठरता. प्रोटीन बार हा सध्याच्या ट्रेंडचा एक भाग झालेला आहे. एक काळ होता, घरातील लहानांपासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत सर्वजण एकत्र बसून सकाळचा नाश्ता करायचे. त्यानंतर घरातून आपापल्या कामासाठी बाहेर पडायचे. मात्र आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबासोबत बसून छान गप्पा मारत जेवण करणे कठीण झाले आहे. प्रत्येकाच्याच नाश्त्याची वेळ आणि त्यानुसार खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्येही बदल झालाय.
सध्याच्या घडीला तरुणांमध्ये, प्रोटीन बार हा एक लोकप्रिय नाश्ता पर्याय म्हणून सर्वत्र दिसून येत आहे. तरूणच काय तर आबालवृद्धांमध्ये प्रोटीन बार खाण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चालवत असाल, मेट्रोने प्रवास करत असताना किंवा कॅबमधून प्रवास करत असताना, प्रोटीन बार खाणे हा एक सोपा पर्याय आहे.यामधून शरिराला आवश्यक प्रमाणात प्रथिने, जीवनसत्वे आणि व्हिटॅमिन्स मिळतात. मात्र नाश्त्यासाठी पोहे, उपमा यासारखे घरगुती पदार्थ न खाता प्रोटीन बार खाणे आरोग्यासाठी खरच फायदेशीर आहे का?
तज्ञांच्या मते दिवसाच्या सुरूवातीलाच नाश्ता वगळल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि चयापचयसारख्या इतर विकारांचा धोका वाढू शकतो. पोषक तत्वांनी समृद्ध, संतुलित नाश्ता केल्याने सकाळची सुरुवात छान होते. नाश्त्यात खाल्लेले कार्ब मेंदूची शक्ती आणि एकूण ऊर्जा वाढवण्यास, साखरेची पातळी योग्य ठेवण्यास मदत होते.
फायदे –
प्रोटीन बार त्वरीत ऊर्जा मिळवण्यासाठी उत्तम आहेत. यामध्ये उच्च प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे मिश्रण असते. त्यामुळे प्रथिने आणि उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. प्रोटीन बार व्यायामापूर्वी किंवा व्यायामानंतर खाणे कधीही चांगले.
प्रोटीन बार स्नायूंची वाढ होण्यास मदत करतात.
प्रोटीन बार खाल्याने भूख नियंत्रणात राहते. तसेच वजन कमी करण्यासही मदत करते.
प्रोटीन बार रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यास मदत होते.
तोटे
प्रोटीन बारमध्ये बहुतेकदा चरबीयुक्त पदार्थ, साखर, कृत्रिम गोड पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी हानीकारक असते.प्रोटीन बारला आपण जेवणाचा किंवा संतुलित आहाराच दर्जा देऊ शकत नाही. कारण यामध्ये अनावश्यक घटक असतात.
प्रोटीन बारमध्ये असलेल्या आर्टीफिशिअल कलर आणि प्लेवरमुळे पोटांसंदर्भातील विकार होण्याची शक्यता असते.
काही प्रोटीन बारमध्ये उच्च कॅलरीज असल्यामुळे वजन वाढण्यासही मदत होते.
प्रोटीन बारचे सेवन हे लहान वयोगटासाठी उत्तम नाही. त्यामुळेच 18 वयोगटातील पुढच्यांनीच हा बार सेवन करावा.