इस्लामपूरचे ईश्वरपूर होणार, राज्याकडून केंद्राला प्रस्ताव

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर गावाचे नाव आता ईश्वरपूर असे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यास विधानसभेने मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले. इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतर केले जावे ही मागणी शिवसेनेकडून सर्वप्रथम करण्यात आली होती आणि त्याचा सातत्याने पाठपुरावाही शिवसेनेने केला.

इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करावे अशी स्थानिक जनतेकडून तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने मागणी होत आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडला. केंद्र सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने या मागणीसाठी इस्लामपूर नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला होता तसेच स्वाक्षरी मोहीमदेखील राबवली होती.

शिवसेनाप्रमुखांनी 1986 मध्ये केली होती घोषणा

1986 सालीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विराट जाहीर सभेत ‘इस्लामपूर नाही, तर हे ईश्वरपूर आहे,’ अशी घोषणा केली होती. तेव्हापासून शिवसेनेने सातत्याने ईश्वरपूरसाठी पाठपुरावा केला होता. 1986 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इस्लामपूर येथे प्रचंड जाहीर सभा झाली. या सभेत शिवसेनाप्रमुखांनी इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर असे केले. तेव्हापासून नामांतराचा मुद्दा चर्चेत आला. शिवसेनेने सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. शिवसैनिकांनी शहरातील 40 हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सरकारला दिले होते. 2014 मध्ये नामकरण समितीची स्थापना करण्यात आली होती. नगरपालिकेने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 18 डिसेंबर 2021 रोजी ईश्वरपूर नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता.