Israel Iran War – इस्रायलने इराणच्या तेहरानमधील प्रसिद्ध गांधी रुग्णालयाला केले लक्ष्य, डागली क्षेपणास्त्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील तणाव आता एका भीषण वळणावर पोहोचला असून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने रौद्र रूप धारण केले आहे. या युद्धाच्या भडक्यात इस्रायली हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानमधील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘गांधी हॉस्पिटल’ला लक्ष्य केले आहे. इस्रायलने या रुग्णालयावर एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रे डागली असून, या हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतरचे भीषण दृश्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून अनेक वॉर्डांचे रूपांतर आता खंडरात झाले आहे.

इराणी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले असून तिथे मोठी आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे जळून खाक झाली आहेत. हल्ल्याच्या वेळी रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार सुरू होते, ज्यामुळे तिथे प्रचंड घबराट आणि पळापळ निर्माण झाली. रुग्णालय प्रशासनाने आणि स्थानिक सुरक्षा दलांनी तातडीने बचावकार्य हाती घेत सर्व रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. विशेष म्हणजे, एका व्हायरल व्हिडिओमध्ये परिचारिकांचा गट नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढताना दिसत आहे.

या हल्ल्यात अनेक रुग्ण, परिचारिका आणि कर्मचारी जखमी झाले असून मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेल्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. इराणने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, नागरी वस्ती आणि रुग्णालयावर केलेला हा हल्ला म्हणजे थेट War Crime असल्याची टीका केली आहे.

गांधी रुग्णालय हे केवळ इराणमधीलच नव्हे, तर आशियातील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. 2008-09 मध्ये स्थापन झालेले हे अत्याधुनिक खाजगी आरोग्य केंद्र 17 मजली रुग्णालय आणि 21 मजली हॉटेल अशा भव्य स्वरूपात विस्तारलेले आहे. आरोग्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या केंद्रात देश-विदेशातील तज्ज्ञ सेवा देत होते. मात्र, या हल्ल्यामुळे या महत्त्वाच्या आरोग्य सुविधेचे अतोनात नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर आता इराण कोणती भूमिका घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.