
अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्ध आता धोकादायक स्थितीत पोहचले आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारी केलेल्या घोषणेमुळे युद्धाला वेगळे वळण लागले आहे. तसेच त्यांच्या या घोषणेने युद्ध थांबवण्याबाबतच्या चर्चा जोर धरत आहे. अमेरिका-इराणमध्ये पाकिस्तानात चर्चा आणि वाटाघाटी सुरू असल्याच्या अटकळी व्यक्त होत आहे. त्याबाबत व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि माजी अध्यक्षीय सल्लागार जेरेड कुशनर हे इस्लामाबादमध्ये इराणी अधिकाऱ्यांना भेटू शकतात, या वृत्तांबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले.
अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लिव्हिट यांनी सांगितले की, परिस्थिती संवेदनशील आणि प्रवाही आहे आणि कोणताही निष्कर्ष काढण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. या कथित बैठकीबाबत एएनआयच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, जोपर्यंत व्हाईट हाऊसकडून औपचारिकपणे घोषणा केली जात नाही, तोपर्यंत अशा घडामोडींना अंतिम मानले जाऊ नये, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
या संवेदनशील राजनैतिक चर्चा आहेत आणि अमेरिका प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वाटाघाटी करणार नाही. ही एक अस्थिर परिस्थिती आहे आणि जोपर्यंत व्हाईट हाऊसकडून औपचारिकपणे घोषणा होत नाही, तोपर्यंत बैठकांबद्दलच्या अटकळींना अंतिम मानले जाऊ नये, असे त्या म्हणाल्या.
रॉयटर्स, फायनान्शियल टाइम्स आणि द टाइम्स ऑफ इस्रायल यांच्या अनेक अहवालांनंतर हे विधान आले आहे, ज्यात असे सूचित केले आहे की मध्यस्थी करणारे देश इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चा आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, शक्यतो काही दिवसांतच चर्चा होणार आहे. या अहवालांनुसार, पाकिस्तानने वॉशिंग्टन आणि तेहरान या दोन्ही देशांशी असलेल्या आपल्या संबंधांचा फायदा घेत स्वतः मध्यस्ताची भूमिका घेतली आहे. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ प्रतिनिधींचा समावेश असलेली बैठक आयोजित करण्यासाठी संपर्क सुरू आहेत, असे एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने नमूद केले आहे.
एका वृत्तानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचे समजते; तर दुसरीकडे, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी अनेकदा संवाद साधला आहे. गेल्या काही दिवसांत राजनैतिक हालचालींना वेग आला असून, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त हे देश अमेरिकेचे विशेष दूत विटकॉफ आणि इराणच्या अधिकाऱ्यांसोबत ‘बॅकचॅनेल’ (गुप्त मार्गाने) राजनैतिक प्रयत्न करत आहेत. तथापि, संघर्ष सुरू झाल्यापासून वॉशिंग्टनसोबत कोणतीही थेट वाटाघाटी झाल्याचे तेहरानने नाकारले आहे.
गेल्या काही दिवसांत, काही मित्रराष्ट्रांमार्फत आम्हाला संदेश प्राप्त झाले. या संदेशांतून अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्याची विनंती केली होती, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, त्या विनंत्यांना योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे. विश्लेषकांच्या मते, हे प्रयत्न अद्याप प्राथमिक टप्प्यावरच आहेत. त्यामुळे युद्ध आता संपुष्टात येत आहे, अशा कोणताही निष्कर्षापर्यंत पोहचू नये. त्यामुळे व्हाईट हाऊसकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.























































